नगरसेवकांचे आता मिशन वॉर्ड सर्चिंग


SHARE

मुंबई- नव्या प्रभाग रचनेचा आणि प्रभाग आरक्षण सोडतीचा दिग्गज नगरसेवकांना फटका बसला आहे. काहींचे प्रभाग गायब झाले आहेत, तर काहींचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. प्रभाग गायब झाले, आरक्षित झाले तरी निवडणूक लढवायची, हेच मुख्य ध्येय ठेवत फटका बसलेल्या दिग्गजांनी आता नव्या प्रभागांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. सध्याच्या प्रभागातून निवडणूक लढवता येत नसली तरी दुसऱ्या कुठल्या प्रभागातून निवडणूक लढता आणि जिंकता येईल, याचा अभ्यास नगरसेवकांकडून सुरू झाला असून काहींनी तर नवे प्रभाग शोधूनही ठेवल्याची चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे स्वत:ला निवडणूक लढवता येत नसली तरी नगरसेवक पद घरातीलच कुणाला तरी जावे यासाठी महिलांसाठी आरक्षित झालेल्या प्रभागात पत्नीला उभे करण्याच्या विचारातही काही नगरसेवक असल्याची चर्चा आहे.

हे घेताताहेत प्रभागांचा शोध...

शुभा राऊळ- शिवसेनेच्या नगरसेविका आणि माजी महापौर शुभा राऊळ या आता प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.

देवेंद्र आंबेरकर- काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी विरोधीपक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांच्या प्रभागाचे तुकडे झाले आहेत. त्यांचा प्रभाग क्रमांक 75 विभागला गेल्याने ते आता नव्या 68 क्रमांकाच्या प्रभागातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी याआधी 2007 मध्ये याच प्रभागातून निवडणूक लढवली होती. 

प्रविण छेडा- विरोधीपक्ष नेते प्रविण छेडा यांचा प्रभाग 132 आणि प्रभागामध्ये विभागला आहे, असे असले तरी ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने ते सध्या नव्या प्रभागाच्या शोधात आहेत.

संदिप देशपांडे- मनसे गटनेते संदिप देशपांडे यांचा प्रभाग राखीव होणे, हे मनसेसाठी सर्वात मोठा फटका असल्याचे म्हटले जात आहे. आजूबाजूच्या प्रभागामध्येही त्यांच्यासाठी संधी नाही, त्यामुळे त्यांच्या पुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी देशपांडे दाखवत असले तरी तेही निवडणूक लढवण्यास इच्छुक असून ते प्रभाग क्रमांक 182 माहिम मच्छिमार काॅलनी या नव्या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी करत असल्याचे समजते आहे.

रईस शेख- समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांच्या प्रभागाचे चार तुकडे झाले आहेत. त्यांनी आता बैंगणवाडी, शिवाजीनगर येथून निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरू केली आहे.

धनंजय पिसाळ- राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. या प्रभागातील नगरसेवक पद आपल्याच घरी यावे यासाठी ते पत्नीला उभे करू शकतील अशी चर्चा आहे. कारण याआधी त्यांच्या पत्नीने निवडणूक लढवली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या