Advertisement

आम्ही महाराष्ट्राच्या पाठिशी, केजरीवालांचा उद्धव ठाकरेंना ‘सपोर्ट’

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवार ३ जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रातील जनतेला पाठिंबा दर्शवला आहे.

आम्ही महाराष्ट्राच्या पाठिशी, केजरीवालांचा उद्धव ठाकरेंना ‘सपोर्ट’
SHARES

अरबी समुद्रात तयार झालेलं निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात येऊन धडकलं आहे. रायगड, अलिबागला जोर दाखवून आता हे वादळ मुंबई, ठाण्याच्या दिशेने निघालं आहे. अशा स्थितीत सर्व आपत्कालीन यंत्रणा या वादळाशी मुकाबला करण्यास सज्ज झालं असून या लढ्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (delhi cm arvind kejriwal shows full support to maharashtra cm uddhav thackeray ahead of cyclone nisarga ) यांना आपला पाठिंबा दिला आहे.

केजरीवालांचं ट्विट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवार ३ जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे की, निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जनतेच्या वतीने माझा तुम्हाला आणि महाराष्ट्रातील जनतेला पूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, असं ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. शिवाय महाराष्ट्रातील जनता या संकटातून सहीसलामत बाहेर येईल, असा विश्वासही दर्शवला आहे.  

हेही वाचा- Cyclone Nisarga: महापालिकेच्या ३५ शाळांमध्ये राहण्याची सोय

वादळ मुंबईच्या दिशेने

रायगड, अलिबाग परिसरात ‘निसर्ग चक्रीवादळा’ने धडक दिली आहे. या वादळाने दुपारी दोनच्या सुमारास समुद्रातून जमिनीवर प्रवेश केला असून या चक्रीवादळाचा परिघ ५० ते ६० किमीपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई समुद्र किनाऱ्यावरही जोरदार वारे वाहू लागले आहे. समुद्रही खवळला आहे. अलिबागहून पुढं सरकत असलेल्या चक्रीवादळाची तीव्रता देखील वाढत आहे. मुंबई, ठाणे किनारपट्टी भागात पोहोचल्यावर प्रतितास १०० ते १२० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्याचा परिणामही जाणवायला लागला असून कुलाबा, कफ परेड, नरिमन पाॅईंट, वरळी, माहीम इत्यादी परिसरातील झाडे जोरदार वाऱ्यामुळे उन्मळून पडत आहेत.

प्रशासनाची व्यवस्था

आपातकालीन परिस्थिती उदभवल्यास त्याचा सामना करण्यासाठी मुंबईत अग्निशमन दलाला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले असून मुंबईतील ६ समुद्र किनाऱ्यांवर ९३ जीवरक्षकांना तैनात करण्यात आले आहेत. तर मुंबईतील वेगवेगळया भागांमध्ये एनडीआरएफच्या ८ आणि नौदलाच्या ५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कुलाबा, वरळी, वांद्रे, मालाड, बोरीवली या भागात प्रत्येकी १ आणि अंधेरीत ३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

तर, मुंबई महापालिकेतर्फे सुमारे ३५ शाळांमध्ये नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. आवश्यकता लागल्यास नागरिकांना स्थलांतरित होण्याचं आवाहन मुंबई पोलीस आणि महापालिकेकडून करण्यात येत आहे. माहीम पथ्थरवाडी येथील २५० लोकांना काॅज वे येथील महापालिका शाळेत हलवण्यात आलं आहे. आपत्कालीन स्थितीत मुंबईकर नागरिक हेल्पलाईन क्रमांक १९१६ डायल करून त्यानंतर ४ दाबून आवश्यक ती मदत मागू शकतात, असं सांगण्यात आलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा