लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही प्रदेश भाजपमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस याच पदावर कायम राहणार असल्याचे समोर आले आहे. या बैठकीत लोकसभेदरम्यान झालेल्या चुका सुधारून विधानसभेला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात राज्य भाजप नेत्यांची बैठक झाली. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार आदी नेते उपस्थित होते.
बैठकीनंतर गोयल म्हणाले की, प्रदेश भाजपमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर सरकारपासून वेगळे होण्याची इच्छा व्यक्त करणारे आणि पक्षाच्या कामावर लक्ष केंद्रित करणारे फडणवीस आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत उपमुख्यमंत्रीपदावर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बावनकुळे प्रदेशाध्यक्ष राहतील. विधानसभेसाठी कोणती रणनीती आखली पाहिजे, याचा आढावा घेण्यात आला. महायुतीतील घटक पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा सुरू केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा