Advertisement

मेट्रो ३ वर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दिशाभूल, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मुंबईकरांचं प्रचंड नुकसान टाळण्यासाठी आरे इथंच कारशेड करण्याबाबत तत्काळ पाऊले उचलण्याची गरज असल्याची मागणी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मेट्रो ३ वर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दिशाभूल, देवेंद्र फडणवीसांचा आरोप
SHARES

मेट्रो-३  च्या कारशेडची जागा बदलण्याचा घातलेला घाट, आधीच अहवाल लिहून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दिशाभूल होत असल्याने राज्याचं आर्थिक आणि मुंबईकरांचं प्रचंड नुकसान टाळण्यासाठी आरे इथंच कारशेड करण्याबाबत तत्काळ पाऊले उचलण्याची गरज असल्याची मागणी पुन्हा एकदा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात, मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरेचीच जागा सर्वार्थाने योग्य असताना कांजूरमार्गच्या जागेचा आग्रह धरला जात आहे. आता तर काही प्रशासकीय अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यातून राज्याचं प्रचंड आर्थिक नुकसान तर होणारच आहे, मुंबईकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असलेला मेट्रो प्रकल्प लांबणीवर पडणार आहे. मुळात मेट्रो कारशेड आरेत करायचं नाही, असा अहवाल आधीच तयार ठेवून नवीन कमिटीचा फार्स करण्यात येत आहे. असं भासवण्याचा प्रयत्न आहे की, आरे कारशेडची जागा २०३१ पर्यंतच पर्याप्त आहे. आणि त्यानंतर नवीन जागा शोधावी लागेल, हे धादांत खोटं आहे. 

मुळात मेट्रो ३ ची अंतिम डिझाईन क्षमता ही २०५३ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन करण्यात आलेली आहे. त्यामुळे २०५३ साली आवश्यक रेक (रेल्वेगाड्या) मावतील, इतकी जागा डेपोमध्ये असणं आवश्यक आहे. उद्घाटनाच्या दिवशी ८ डब्यांच्या एकूण ३१ गाड्या पुरता कार डेपो लागेल. २०३१ मध्ये ८ डब्यांच्या एकूण ४२ गाड्या लागतील. तर २०५३ मध्ये ८ डब्यांच्या एकूण ५५ गाड्या चालतील. ही संपूर्ण गरज सामावून घेण्यासाठी डेपोची रचना करण्यात आली आहे.

आरे तांत्रिक समितीने मेट्रो कारशेडसाठी एकूण ३० हेक्टर जागा वापरण्यास मान्यता दिली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २५ हेक्टर जागा वापरण्यासाठी परवानगी दिली. तिथंच आता कारशेडचं बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी ८ डब्यांच्या ४२ गाड्यांची व्यवस्था होत आहे. जी २०३१ पासून पुढील ८ ते १० वर्षांपर्यंत पर्याप्त आहे. त्यानंतर PHPDT (peak hour peak direction traffic) नुसार २०३१ ते २०५३ या कालावधीत प्रवासी वाढल्यास अंतिम डिझाईन क्षमतेप्रमाणे ८ डब्यांच्या १३ गाड्या टप्प्याटप्प्याने दाखल कराव्या लागतील. 

हेही वाचा- वकरच मुंबईत धावणार विनाचालक मेट्रो

२०३१ ते २०५३ पर्यंत टप्प्याटप्प्याने ८ डब्यांच्या १३ गाड्या वाढवताना जी अतिरिक्त जागा लागणार ती या उर्वरित ५ हेक्टरपैकी केवळ १.४ हेक्टर इतकीच लागणार आहे. या जागेवर १६० झाडे आहेत. जी २०५३ पर्यंत टप्प्याटप्प्याने रिलोकेट करुन रिप्लांट करावी लागतील. याचाच अर्थ असा की आरेमध्ये अंतिम क्षमता सामावून घेण्याइतकी पर्याप्त जागा उपलब्ध आहे. 

मात्र त्याचवेळी कारडेपो कांजूरमार्गला नेताना यापेक्षा ३ पट झाडे तोडावी लागतील. तसंच केवळ जागा बदलण्याच्या हट्टाहासापायी हजारो कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. शिवाय मुंबईकरांना (mumbai) यावर्षाअखेर जी मेट्रो मिळणार होती, ती आता किमान ४ वर्षे तरी उपलब्ध होणार नाही. ही अत्यंत अन्यायकारक बाब आहे.

मेट्रोच्या २-३ लाईन्स एकत्रित करून कारडेपोचं नियोजन करणं ही पूर्णत: अव्यवहार्य संकल्पना आहे. कारण मेट्रो ३ चा विचार केला तर कारडेपोचा खर्च हा एकूण प्रकल्पाच्या खर्चाच्या तुलनेत अवघ्या १ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. अशा परिस्थितीत कारशेड आरेपासून ८ किमी दूर अंतरावर नेऊन नवीन जागी बांधणं, यामुळे प्रकल्प किंमतीत होणारी वाढ कितीतरी अधिक आहे.  

असंही लक्षात आलं आहे की, कांजूरमार्ग (kanjurmarg) येथील खासगी दावाधारकांनी आर्थर अँड जेकिंग्ज या मोठ्या लीजधारकांना पाॅवर आॅफ अॅटर्नी दिली असून शासन त्यांच्याशी चर्चा करत आहे. तसंच त्यांना मोठी जागा ओपन रेसिडेन्शियल आणि कमर्शियल वापरा अनुज्ञेय करून उर्वरीत जागा शासन घेणार असं ठरत आहे. यामुळे खासगी विकासकांना हजारो कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासकीय अधिकारी आपली प्रचंड दिशाभूल करत आहेत, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

(devendra fadnavis slams bureaucrats for misleading on mumbai metro 3 aarey car shed)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा