मुंबईत तुंबलेल्या पावसाच्या पाण्यानं मुंबई महानगरपालिकेच्या सर्व दाव्यांची पोलखोल केली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईची तुंबई झाली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात पालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला चांगलंच धारेवर धरलं. महापालिकेत प्रशासक नेमा, प्रशासनाच्या आतापर्यंतच्या कामांची चौकशी करा, अशा मागण्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केल्या आहेत.
'मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र सगळं व्यवस्थित काम करत आहे असं सांगितलं जातंय. त्यामुळे महापौर, उपमहापौर चुकत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, वेळ पडली तर प्रशासक आणा, मनपा बरखास्त करून टाका', अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.
'पावसाळ्यात मुंबई तुंबल्यावर यांच्या कामाची पोलखोल होते. त्यामुळं याची खोलात जावून चौकशी व्हावी आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाही', अशा शब्दात अजित पवार यांनी विधानसभेत संताप व्यक्त केला. 'मनुष्याला एकदाच जन्म मिळतो त्यामुळं किड्या मुंग्यासारखं लोक मरत असतील तर हे सरकारचं अपयश आहे. त्यामुळं याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. त्यामुळं अशा घटना घडू नयेत ही जबाबदारी सरकारने घ्यावी' असंही अजित पवार यांनी म्हटलं.
'मुंबईत मुसळधार पाऊस पडतो आहे. लोकांचा जीव धोक्यात आला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना भरीव मदत द्यावी, गेलेली व्यक्ती भरीव मदत दिल्यामुळं परत येत नाही. कर्ती व्यक्ती गेली की, घर आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतं. मुंबई ही तुमची माझी देशाची आर्थिक राजधानी पुर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईत पाणी तुंबलं असून, मुंबईचे प्रथम नागरिक मुंबई तुंबली नाही असं सांगत आहेत. काय केल्यावर मुंबई तुंबली हे यांना कळणार आहे' अशी टीकाही अजित पवार यांनी महापौरांवर केली आहे.
हेही वाचा -
मुंबईच्या महापौरांना मनसेनं पाठवला जाड भिंगाचा चष्मा
मुख्यमंत्र्यांसह आदित्य ठाकरेंची पालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट