इडीच्या रडारवरचा दुसरा नेता कोण?

 Mumbai
इडीच्या रडारवरचा दुसरा नेता कोण?

मुंबई - केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयानं (इडी)च्या रडारवर देशातल्या नामांकित उद्योगपतींसह बडे राजकारणीसुद्धा आले आहेत. शनिवारी इडीनं मुंबईसह देशभरात 300 कंपनांच्या जागांवर धाडी घातल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 35 ठिकाणी इडीनं धाडी घातल्या आहेत. नजिकच्या भविष्यात हे धाडसत्र सुरू राहण्याची शक्यता आहे. मुंबईत घातलेल्या छापेमारीत महाराष्ट्राचे माजी उप मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेता छगन भुजबळ यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील काही कंपन्यांचा समावेश आहे. या फेऱ्यात भुजबळ यांच्यासोबत महाराष्ट्रातील आणखी एक मोठा नेता अडकण्याची शक्यता आहे. बोगस कंपन्यांच्या नावे अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करून तपास यंत्रणांनाही गुंगारा देणाऱ्या या नेत्याच्या गैरव्यवहारासंदर्भात अतिशय महत्त्वाचे आणि गोपनीय दस्तावेज इडीच्या हाती आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावशाली असलेल्या या नेत्यानं राजकारणात सक्रीय असलेल्या आपल्या मुलांसह बांधकाम उद्योग आणि इतर व्यवसायात जम बसवला आहे. उण्यापुऱ्या 55 बोगस कंपन्यांमध्ये या नेत्याने गुंतवणूक करून ठेवली आहे. त्यातल्या काही कंपन्यांवर इडीनं धाडी घातल्या. राज्याच्या राजकारणात कधीही धरणीकंप घडवून आणण्याची क्षमता असणाऱ्या या नेत्याचं आक्रमण थोपवून धरण्यासाठी त्यांच्या मार्गात इडीचे काचा विखुरण्यात आल्याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. दरम्यान इडीच्या आजच्या छापेमारीत मुंबईतल्या एका ऑपरेटरने 20 डमी संचालकांच्या माध्यमातून छगन भुजबळ यांच्यासाठी तब्बल 46.7 कोटी रुपयांचा व्यवहार घडवून आणल्याची माहिती पुढे आली आहे. भुजबळपाठोपाठ ज्या दिग्गज नेत्याकडे इडीची वक्रदृष्टी वळली आहे, त्या नेत्यानं सध्या ‘इडी पिडा’ टळावी, म्हणून आपलं सर्व राजकीय वजन पणाला लावत केंद्रातल्या भाजपाच्या मोठ्या नेत्याकडे मदतीसाठी बोलणी सुरू केली आहे.

Loading Comments