'ते' माजी मुख्यमंत्री ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात

  Pali Hill
  'ते' माजी मुख्यमंत्री ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात
  मुंबई  -  

  मुंबई - अंमलबजावणी संचालनालयानं मनी लॉन्ड्रिंग तसंच अवैध मालमत्तेपकरणी माजी मुख्यमंत्र्याभोवती फास आवळण्यास सुरुवात केलीय. 300 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे कुटुंबीय आणि एक बांधकाम व्यावसायिक चौकशीच्या फेऱ्यात असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिलीये. अद्याप या नेत्यांच्या नावांबद्दल ईडीनं चुप्पी बाळगलीय. सगळ्यांच्या चौकशीनंतरच इडी गुन्हा दाखल करू शकते.

  चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या या नेत्यानं एका बांधकाम व्यावसायिकासह भागीदारी करून 300 कोटी रुपये दक्षिण मुंबईच्या एका प्रोजेक्टमध्ये गुंतवल्याची माहिती अमलबजावणी संचालनालयाच्या हाती लागलीय. याच प्रोजेक्टमध्ये गुतवलेला पैसा परदेशातील सायप्रस आणि माॅरिशस इथल्या बँक खात्यात वळवण्यात आला. ही सर्व खाती माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे असल्याचंही समोर आलंय. माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांच्या बँक खात्यांचे काही व्यवहार ईडीच्या हाती लागलेत. ते संशयास्पद असल्यानं, ईडीनं माजी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर करडी नजर ठेवलीय.

  "यासंदर्भात ठोस माहिती नाही. मात्र अशीच काही प्रकरणं समोर आल्यानंतर असं वाटतंय की माजी मंत्र्यांना जाणून बुजून लक्ष्य केलं जातंय," असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई लाइव्हला ही प्रतिक्रीया दिलीय.

  "याप्रकरणात कुठल्याही राजकीय व्यक्तीचा हात असला तरी कारवाई नक्की होणारच," असं भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मुंबई लाईव्हशी बोलताना सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.