Advertisement

पहाटे शपथ घेताना तुम्हाला राष्ट्रवादी चालते, मग मला का नाही?- एकनाथ खडसे

मला तर आता राष्ट्रवादी पक्ष तुमच्यापेक्षाही चांगला वाटतो आहे. म्हणूनच मी राष्ट्रवादीत आलो, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांवर हल्ला चढवला.

पहाटे शपथ घेताना तुम्हाला राष्ट्रवादी चालते, मग मला का नाही?- एकनाथ खडसे
SHARES

मी राष्ट्रवादीत जाणार म्हटल्यावर भाजपमध्ये बोंबाबोंब सुरू झाली. जेव्हा तुम्ही सकाळी ५ वाजता शपथ घेतली तेव्हा तुम्हाला राष्ट्रवादी पक्षच चांगला वाटला ना? मला तर आता राष्ट्रवादी पक्ष तुमच्यापेक्षाही चांगला वाटतो आहे. म्हणूनच मी राष्ट्रवादीत आलो, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांवर हल्ला चढवला.

शुक्रवार २३ आॅक्टोबर रोजी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. खडसे यांच्यासोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे, माजी आमदार रवींद्र पाडवी, गुरुमुख जगवानी, निवृत्ती पाटील, कैलास सूर्यवंशी, राजीव माळी, जळगाव भाजपचे सरचिटणीस संदीप देशमुख, मधुकर राणे, मंदा खडसे यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 

यावेळी भाषण करताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, मी गेल्या ४० वर्षांपासून राजकारण करतो आहे. पण कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ आहात असं म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. महिलेला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही. ४० वर्षे मी भाजपची सेवा केली, भाजपनं मला दिलं, पण छळलं त्याचं काय? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपाचे लोक देऊ शकले नाही. त्यामुळे मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची तीव्र भावना होती.  (eknath khadse officially joined ncp)

हेही वाचा - खडसेंना राष्ट्रवादीत घेण्यामागे पवारांचं राजकीय गणित पक्कं- संजय राऊत

माझ्या मागे भूखंडाची चौकशी लावण्यात आली. काही दिवस जाऊ द्या, कुणी कुणी भूखंड घेतले ते बाहेर काढतो. त्यांनी माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन. मला राजकीय जीवनातून घरी बसवण्याचा प्रयत्न झाला. तिकिट मागितलं तर तुम्ही ज्येष्ठ आहात. नाथाभाऊ आम्हाला मार्गदर्शन करा, असं उत्तर मिळायचं. ज्यांना भाजपात येऊन चार दिवस झाले नाहीत ते मला मार्गदर्शन करायला सांगतात. मला दुसरा पर्याय नव्हता. दिल्लीतल्या वरिष्ठांनीही मला राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. आज राष्ट्रवादीत आल्याने माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय, असं एकनाथ खडसे म्हणाले. 

आजपर्यंत ज्या निष्ठेनं भाजपचं काम केलं, त्याच निष्ठेनं राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करेन. दुप्पट वेगाने मी पक्ष वाढवेन. माझी ताकद काय आहे ते मी तुम्हाला दाखवेन. जळगावातील सर्वात मोठं मैदान ओतप्रोत भरून दाखवेन, असं आव्हान देखील एकनाथ खडसे यांनी भाजपला दिलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा