Advertisement

मतदान केंद्रावर यंदा विविध सुविधा, लहानमुलांसाठी पाळणाघर

मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान केंद्रांवर अत्यावश्यक किमान सुविधांची संख्या यावर्षी दुप्पट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लहान मुलांसाठी पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मतदान केंद्रावर यंदा विविध सुविधा, लहानमुलांसाठी पाळणाघर
SHARES

यंदा लोकसभा निवडणुकीसाठी जास्तित जास्त मतदारांनी मतदान करावं, यासाठी निवडणूक आयोगानं कंबर कसली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान केंद्रांवर अत्यावश्यक किमान सुविधांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लहान मुलांसाठी पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


१५ प्रकारच्या सुविधा 

निवडणूक आयोगामार्फत गेल्या निवडणुकीत मतदान केंद्रांकर सुमारे ७ प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये रॅम्पची व्यवस्था, पिण्याचं पाणी, विजेची उपलब्धता, मदत कक्ष, स्वच्छतागृहांची सुविधा इत्यादी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, यंदा त्या सुविधांमध्ये दुपटीनं वाढ करून १५ प्रकारच्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, याबाबत निवडणूक आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 


नव्या सुविधा

नव्याने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेतील मेडिकल किटमध्ये वेदनाशामक औषध, बॅण्डेज, ओआरएस पावडर, जखमेवर लावण्यासाठी पट्टी आदी साहित्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर एक वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध असणार आहे. वाढत्या तापमानाची दखल घेताना मतदान केंद्रांवर महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि महिलांसोबत असलेल्या लहान मुलांचा उन्हापासून बचावाकरिता सावलीसाठी मंडप टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


लहान मुलांसाठी पाळणाघर

महिला मतदारांसोबत आलेल्या लहान मुलांकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसंच, या ठिकाणी एक प्रशिक्षित सहाय्यक या मुलांची काळजी घेण्यासाठी नेमण्यात येणार आहे. 


मदतीसाठी स्वयंसेवक

त्याशिवाय, मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट आणि गाइड विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. हे विद्यार्थी मतदार रांगेचं व्यवस्थापन करण्याबरोबरच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी मदत करणार आहेत. त्याशिवाय, या स्वयंसेवकांसाठी पाणी व खाद्यपदार्थांची व्यवस्था असणार आहे.

ज्या अंध आणि दिव्यांग मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडं माहिती देऊन मतदानासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी केली असेल अशा मतदारांसाठी घर ते मतदान केंद्र वाहनाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसेल तिथं खासगी वाहन भाड्यानं घेऊन या मतदारांची ने-आण करावी, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.



हेही वाचा -

एप्रिल फूल नव्हे, नव्या आर्थिक वर्षातले 'कूल' बदल

उर्मिलाने चालवली रिक्षा, गोराईतील रिक्षा चालकांना केलं खूश



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा