सोमय्या, ठाकूर, पुरोहित पुत्र जिंकले

 Mumbai
सोमय्या, ठाकूर, पुरोहित पुत्र जिंकले

मुंबई - महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या नेत्यांनी आपल्या पुत्रांसाठी जोरदार फिल्डिंग लावत उमेदवारी मिळवली. मात्र, या उमेदवारीवरून आरोप आणि टिकाटिपण्णी झाल्या. पण यानंतरही भाजपाच्या नेत्यांच्या मुलांनी बाजी मारत विजय संपादन करत अखेर राजकारणात लोकप्रतिनिधी बनण्याचा श्रीगणेशा केला.

भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी आपले पूत्र नील यासाठी प्रभाग क्रमांक १०८ मधून उमेदवारी मिळवली होती. तर मंत्री विद्या ठाकूर यांचे पूत्र या दीपक यांना प्रभाग ५० आणि राज पुरोहित यांचे पुत्र आकाश पुरोहित यांना २२१मधून निवडणूक रिंगणात उतरले होते. परंतु या तिन्ही भाजपा नेत्यांच्या पूत्रांनी विजय मिळवला आहे.

नील सोमय्यांचा पराभव करण्यासाठी शिवसेनेच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी जाहीर सभा घेऊन प्रचार केला. यासाठी शिवसेनेने सर्व शक्ती पणाला लावूनही अखेर शिवसेनेचे उमेदवार मुकेश कारिया यांचा पराभव करून नील सोमय्यांनी विजय मिळवला. गोरेगावमध्ये प्रभाग ५० मध्ये काँग्रेसच्या स्नेहा झगडे यांचा पराभव करून दिपक ठाकूर हे विजयी झाले. तसेच भाजपातून बंडखोरी करत काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या जनक संघवी यांचा पराभव करत आकाश पुरोहित यांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच आमदार भारती लव्हेकर यांचा भाचा त्यागराज दाभाडकर यांनी यशोधर फणसे, ज्योत्स्ना दिघे यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. तसेच आमदार अमित साटम यांचे मेव्हणे रोहन राठोड हेही विजयी झाले आहेत. माजी आमदार अशोक जाधव यांची कन्या अल्पा यांचाही विजय झाला आहे.

नबाव मलिकांचे भाऊबहिण जिंकले, मुलीचा पराभव
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपली बहीण, भाऊ आणि मुलगी या तिघांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. परंतु प्रत्यक्षात मलिक यांची मुलगी सना यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु प्रत्यक्षात सना यांचा पराभव झाला. डॉ. सईदा खान आणि कप्तान मलिक यांचा विजय झाला. भाऊ आणि बहिण विजयी झाली असली तरी सनाचा पराभव मलिक कुटुंबाला चांगलाच जिव्हारी लागला आहे.

Loading Comments