Advertisement

देशविघातक प्रवृत्तींना रोखण्यासाठी सजग रहा- मुख्यमंत्री


देशविघातक प्रवृत्तींना रोखण्यासाठी सजग रहा- मुख्यमंत्री
SHARES

जगभरात सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांना अटकाव घालण्यासाठी पोलीस किंवा सैन्यांच्या सुरक्षेवर अवलंबून न राहता देशातील प्रत्येक नागरिकाने सजग राहण्याची आवश्यकता आहे. देश व समाजविरोधी प्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि सुरक्षा बळकट करण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करावं. हिच दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) वतीने शहिदांच्या स्मरणार्थ आयोजित दिव्यांगांची कार रॅली तसेच सायकल रॅलीचा समारोप रविवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अरुण कुमार, महानिरीक्षक रमेशचंद ध्यानी आदी उपस्थित होते.


१४०० किमी रॅली

सीमा सुरक्षा दलाच्या वतीने दिल्लीतील इंडिया गेट येथून १४ नोव्हेंबर रोजी या रॅलीला सुरूवात झाली. १४०० किमीचा प्रवास करून ही रॅली गेट वे ऑफ इंडिया येथे पाेहोचली. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या कॉन्स्टेबल लाला व कॉन्स्टेबल हरेंदर या दिव्यांग जवानांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



दहशतवादाला संपवणारा देश

आजच्या दिवशी मुंबईवर अनेक ठिकाणी हल्ला झाला होता. या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेलं ताज हॉटेल आजही पूर्वीच्याच दिमाखात उभं आहे. भारत दहशतवादाने संपणारा देश नसून दहशतवादाला नष्ट करणारा देश असल्याची भावना हॉटेल ताजने जगाला दाखवून दिली. भारताकडे असलेल्या सीमा सुरक्षा दल, एनएसजी, फोर्स वन आणि अर्धसैनिक दलासारख्या सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता या जवानांमुळे आपल्याकडे आहे. डोकलाममधील सैन्यांच्या कारवाईनंतर भारत हा कमजोर देश नसून मजबूत देश असल्याचं सगळ्या जगाने पाहिलं आहे. या देशाला मजबूत बनविण्याचं श्रेय या सैन्यातील जवानांना आहे.


मुंबईच्या सुरक्षेसाठी 'फोर्स वन'

स्वतः च्या स्वार्थी, अहंकारी व चुकीच्या विचारसरणीसाठी हे लोक जगात व देशात दहशतवादाच्या घटना घडवित आहेत. अशा घटनांना रोखण्यासाठी आपल्याकडे मजबूत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत 'फोर्स वन' सारखी सुरक्षा यंत्रणा असून ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणाही बसविण्यात आली आहे. तसेच आधुनिक सुरक्षा सामग्रीही सुरक्षा दलांना देण्यात आली आहे. परंतु देशातील, शहरांच्या सुरक्षेसाठी फक्त पोलीस अथवा सैन्याच्या यंत्रणेपुरतेच सिमीत न राहता प्रत्येक नागरिकाने सजग रहायला हवं. प्रत्येकाने सुरक्षेच्या दृष्टिने सतर्क राहून सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करावे. शहिदांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन आपल्या देशाची, शहराची सुरक्षा एवढी भक्कम करावी, की जेणेकरून कुठलाही दहशतवादी पुन्हा येथे घुसता कामा नये. हाच ध्यास आजच्या दिवशी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.


अपंगत्व मनाने, शरीराने नव्हे...

वेगवेगळ्या कारवाईमध्ये सहभागी होताना अपंगत्व आलेल्या बीएसएफच्या जवानांनी या रॅलीत सहभागी होऊन अपंगत्व मनाने येतं शरीराने नव्हे, हे दाखून दिलं आहे. १४०० किमीचा प्रवास करून या जवानांनी देशातील नागरिक, युवकांना प्रेरणा दिल्याचे गौरोवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा