शिवसेनेच्या नेत्यांनाच घरं कशी लागतात? निलेश राणेंचा आरोप, न्यायालयात जाणार

म्हाडा प्राधिकरणाच्या अध्यक्ष शिवसेनेचे आमदार उदय सामंत आहेत आणि शिवसेनेच्या ३ जणांना लाॅटरीत महागडी घरं कशी लागतात? असा सवाल करत निलेश राणे यांनी लाॅटरीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

SHARE

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १३८४ घरांसाठी नुकतीच लाॅटरी पार पडली. मात्र या लाॅटरीला वादाचं ग्रहण लागण्याची शक्यता आहे. कारण या लाॅटरीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या अध्यक्ष शिवसेनेचे आमदार उदय सामंत आहेत आणि शिवसेनेच्या ३ जणांना लाॅटरीत महागडी घरं कशी लागतात? असा सवाल करत निलेश राणे यांनी लाॅटरीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


कुणाला लागलं घर?

रविवारी म्हाडाच्या १३८४ घरांसाठी लाॅटरी पार पडली. या घरांसाठी १ लाख ६४ हजार अर्ज सादर झाले होते. यावरून मुंबईत मोठ्या संख्येनं गरजूंना घरांची गरज असून ही गरज पूर्ण करण्याचं काम म्हाडाचं आहे. असं असताना गरजूंची घरं शिवसेनेतील ठराविक लोकांना मिळत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. या लाॅटरीत शिवसेनेचे आग्रीपाडा येथील शाखाप्रमुख विनोद शिर्के यांना ग्रँट रोडमधील धवलगिरी सोसायटीतील ४ कोटी ९९ लाखांचं आणि ५ कोटी ७० लाखांचं अशी दोन घरं लागली आहेत.


यांचा समावेश

ग्रँट रोडमध्ये ५ ते ६ कोटींची ३ घरं होती आणि याच घरांकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. त्यातही या ३ घरांसाठी अंदाजे १३६ अर्ज आले होते. याचसोबत शिवसेनेचे नाशिकमधील खासदार हेमंत गोडसे यांना लोअर परळमधील ९९ लाख किंमतीचं घर लागलं असून शिवसेनेचेच सायन प्रतिक्षानगर येथील नगरसेवक रामदास कांबळे यांना पवई, तुंगा येथील ९९ लाखांचं घर लागलं आहे.


गैरव्यवहार बाहेर काढणार

या तिन्ही शिवसेनेच्या नेत्यांनाच महागडी घरं याच लाॅटरीत तेही शिवसेनेचे उदय सामंत अध्यक्ष झाल्यावर कशी लागली? असा निलेश राणेंचा सवाल आहे. तर सामंत लबाड माणूस असून ते सध्या बिल्डरांना जवळ करत आहेत. त्यांचे सर्व गैरव्यवहार आपण बाहेर काढू, असं म्हणत लाॅटरीला न्यायालयात आव्हान देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. दरम्यान याविषयी उदय सामंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण ते पुण्याच्या लाॅटरीत व्यस्त असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


नावाजलेलं साॅफ्टवेअर

मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी दिपेंद्रसिंग कुशवाह यांनी मात्र 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना लाॅटरीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप साफ फेटाळून लावले आहेत. म्हाडाच्या लाॅटरीची प्रक्रिया पूर्णत पारदर्शक असून त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप होत नाही. म्हाडाचं लाॅटरीचं साॅफ्टवेअर देशभरात नावाजलं गेलं असून अनेकांनी हे साॅफ्टवेअर स्वीकारलं आहे. असं असताना लाॅटरीत भ्रष्टाचार होणं शक्यच नसल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला आहे. तर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांनी ते पुराव्यानिशी सिद्ध करावं मग मुंबई मंडळ काय ती कार्यवाही, करेल असं म्हणत त्यांनी निलेश राणेंचे आरोप चुकीचे असल्याचं सांगितलं.हेही वाचा-

म्हाडा अध्यक्ष उदय सामंत म्हणतात, 'माझ्या जीवाला धोका', मागितली पोलिस सुरक्षा

म्हाडाच्या लाचखोर अधिकाऱ्यास अटक; घराचं अामिष दाखवून फसवणूकसंबंधित विषय
ताज्या बातम्या