पाठिंबा द्या नाही तर विरोधात बसा!

 Mumbai
पाठिंबा द्या नाही तर विरोधात बसा!

मुंबई - भाजपा विरोधी पक्षात बसणार नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. परंतु बुधवारी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपा कुणाच्या बाजुने मतदान करते याकडेच सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणवणाऱ्या भाजपाला एक तर सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान करावे लागेल अन्यथा विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे लागणार आहे.

मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने विश्वनाथ महाडेश्वर आणि काँग्रेसच्या वतीने विठ्ठल लोकरे यांच्यात लढत आहे. तर, उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून हेमांगी वरळीकर आणि काँग्रेसकडून विनी डिसोझा यांच्यात लढत होणार आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे 88 नगरसेवक आहेत तर भाजपाचे संख्याबळ 84 एवढे झाले आहे. मात्र, भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असतानाही त्यांनी महापौर, उपमहापौरपदासह सर्व समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर करतानाच आपण विरोधी पक्षात न बसता पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करू, असं स्पष्ट केलं आहे.

परंतु भाजपाने जरी अशी भूमिका घेतली असली तरी भाजपा हा पक्ष विरोधीपक्ष म्हणूनच ओळखला जाणार आहे. महापालिकेच्या अधिनियमानुसार सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षासोबत युती अथवा आघाडीत नसलेल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेला मोठा पक्ष हाच विरोधी पक्ष म्हणून निवडला जातो. त्या पक्षाचाच नेता हा विरोधी पक्षनेता म्हणून निवडला जातो. परंतु जर दुसऱ्या क्रमांकावरील पक्षाने विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्यास नकार दिला तर त्यानंतरच्या मोठ्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिले जावे, याबाबत महापालिकेच्या अधिनियमात कुठेही स्पष्टता नाही. त्यामुळे भाजपाला बुधवारी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने मतदान करून पारदर्शकतेचे पहारेकरी बनता येणार आहे. पण, जर त्यांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान न केल्यास त्यांना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे लागेल.

Loading Comments