शेवटचा टोला

Mumbai
शेवटचा टोला
शेवटचा टोला
शेवटचा टोला
शेवटचा टोला
शेवटचा टोला
See all
मुंबई  -  

मुंबई - मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा शनिवारी धडाडल्या. प्रचार सभांच्या या शेवटच्या दिवशी शिवसेना, भाजपा, मनसे, काँग्रेस आणि एआयएमआयएम यांनी निवडणुकीत वातावरण तापवले. प्रचार सभांच्या माध्यमातून शेवटचा टोला लगावताना ठाकरे बंधुंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागत हे मुख्यमंत्री थापाडे असल्याची जोरदार टिका केली. तर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या वाघालाच ललकारत खरा वाघ मोदीच असल्याचे सांगितले.

महापालिका निवडणुकांचा प्रचारसभांचा शनिवार मुंबईत रंगतदार ठरला. यंदा युती आणि आघाडी तुटल्यामुळे स्वतंत्र लढणाऱ्या पक्षांच्या स्वतंत्र प्रचार सभांनी राजकीय वातावरणच ढवळून निघाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा वांद्र्याच्या बीकेसीत पार पडली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा दादरमधील दत्ता राऊळ मैदानात पार पडली. तर भाजपाची प्रचार सभा सोमय्या मैदानावर, काँग्रेसची सभा अँटाॅप हिलमध्ये आणि एआयएमआयएमची सभा नागपाड्यात झाली.

प्रचार सभांमध्ये भाषण करण्याचे टायमिंग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी चांगलेच साधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाषणाला उभे राहिल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही भाषणाला सुरुवात झाली. उद्धव ठाकरे यांनी गिरगावमधील पहिल्या सभेत जे भाषण केलं, त्या भाषणावर प्रचार शेवटच्या सभेत अंतिम हात फिरवला. जुन्याच भाषणाची टेप वाजवत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या थापा ऐकून लोक सुद्धा कंटाळलेत, असे सांगत आज सीसीटीव्ही आहेत म्हणून नाहीतर तर शिवसेना आणि शिवसैनिक असल्यामुळे मुंबई सुरक्षित असल्याचे सांगितले. नालेसफाईच्या भ्रष्टाचाराचा आरोप आमच्यावर केला जातो. नालेसफाईचा जर पैसा आमच्या खिशात गेला, असे आरोप भाजपाकडून होत आहे, मग गंगा नदीच्या साफसफाईचा पैसा का मोदींच्या खिशात गेला आहे आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपाने आता पाठिवर वार करण्याचे बंद करावे. लढायचे असेल तर समोर या, असे आव्हान त्यांनी भाजपाला दिले. मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी आहेत, पक्षीय धुणी धुण्यासाठी नाहीत. आमचे शिवसैनिक जेव्हा धुवायचे तेव्हा धुतील म्हणून आरोप करताना जरा जपून, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.

दादरमधील सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना भाजपाचा समाचार घेतला. कुणी किती काम केली हे कुणीच सांगत नाही, फक्त आश्वासनांची हवा, असल्याचा टोला त्यांनी मारला. उद्धव ठाकरेंकडे जलपुजनच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ढुंकून पाहिले नाही. खरं त्यांनी तेव्हाच बोटीतून उडी मारायला हवी होती, असे सांगत बिल्डरच्या घशात जागा जातात, पण बाळासाहेबांच्या स्मारकाला जागा मिळत नाही. आता आपला महापौर राणीच्या बागेत राहायला जाणार आहे. पुढच्यावेळी एक महापौर त्यातल्या पिंजऱ्यात पाहायला मिळेल, अशीही खिल्ली त्यांनी उडवली.

नागपाड्यातील सभेत एआयएमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी यांनी देशात ७० वर्षांत किती सरकार आल्या व गेल्या परंतु आमची परिस्थिती जशी होती तशीच आहे, असे सांगत मतलिस इथे आली आहे, ती तुमची परिस्थिती बदलायला. सत्ता मिळवण्याचा आपला हेतू नसल्याचा त्यांनी म्हटले आहे. राजकारणात शरद पवार, मोदी, गांधीं आवाज आहे. पण २५ कोटी मुसलमानांचा आवाज नाही, अशा शब्दात ओवेसीने गरळ ओकली.

अँटॉप हिलमधील काँग्रेसच्या सभेत प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी, मुख्यमत्र्यांची खिल्ली उडवत म्हणाले, मुख्यमंत्री म्हणतात परिवर्तन होणार म्हणून. हे परिवर्तन होणार आहे, पण ते भाजपाचे नसून काँग्रेसच्याबाजूने परिवर्तन होणार आहे. आमच्या खेडयापाड्यातही मुंबई इतके खड्डे नाही, असे सांगत २२ वर्षे दोघांनी मिळून खाल्ले. पण हे खाताना पारदर्शकता कुठे गेली होती, असा सवाल चव्हाण यांनी केली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमंत महापालिका असताना पाणी, आरोग्य सुविधा देवू शकले नाहीत. शिवसेनेला टोला लगावत फडणवीस म्हणाले, मी सामान्य माणूस आहे. मी कल्याण- डोबिवलीत दाखवलं. वाघाच्या पंज्या मला दाखवू नका. सामान्य माणूस मागे असला तर काय करतो हे दिसले. स्वत:च्या घरात असणारा वाघ नसतो. तर शत्रूच्या घरात घुसून मारतो तो वाघ असतो. ते वाघ नरेंद्र मोदी आहे, असे सांगत शिवसेनेची खिल्ली उडवली.

प्रचाराच्या रणधुमाळीत प्रचाराचा रविवारचा शेवटचा दिवस आहे. पण शनिवारी प्रचार सभांच्या शेवटच्या दिवशी महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी एकमेकांना टोला हाणत मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु या राजकीय आरोप- प्रत्यारोपांमध्ये मतदार मात्र, गोंधळलेल्या स्थितीत आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.