अर्थसंकल्पात फक्त घोषणा, ठोस काहीच नाही - अशोक चव्हाण

  Mumbai
  अर्थसंकल्पात फक्त घोषणा, ठोस काहीच नाही - अशोक चव्हाण
  मुंबई  -  

  मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही ठोस योजना नाहीत. केवळ घोषणांचा वर्षाव आहे. हा अर्थसंकल्प सर्वच घटकांना निराश करणारा आहे. कॉर्पोरेटसाठी अनेक सवलती जाहीर केल्या असल्या तरी सर्वसामान्यांसाठी मात्र या अर्थसंकल्पात काहीच नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

  केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कॉर्पोरेट आणि उद्योग क्षेत्राला अनेक सवलती दिल्या आहेत, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. नोटाबंदीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी, छोटे व्यापारी यांना दिलासा देण्यासाठी सरकार काही उपाययोजना करेल अशी अपेक्षा होती. पण अरूण जेटलींनी जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. नोटाबंदीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार कर्जमाफीची घोषणा करेल अशी अपेक्षा होती सरकारने देशभरतील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असे चव्हाण म्हणाले.
  अर्थसंकल्पात गुजरात आणि झारखंडमध्ये एम्स उभारण्याची घोषणा करण्यात आली पंरतु महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली आहेत. राज्यात रेल्वेच्या नव्या प्रकल्पाबाबत, मुंबई उपनगरीय रेल्वेच्या विकासासाठी कोणतीही ठोस तरतूद नाही. अर्थमंत्री अरूण जेटलींनी महाराष्ट्राला भाषणाशिवाय काही दिले नाही असे खासदार चव्हाण म्हणाले. दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांसाठी या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची आणि निधीची अपेक्षा होती. पण सरकारने सर्व घटकांना निराश केले आहे. बेरोजगारी कमी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत असतात मात्र या अर्थसंकल्पात बेरोजगारी कमी करण्यासंदर्भात कुठलीही योजनाही जाहीर केली नाही. मोदी सरकारने सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केली आहे असे चव्हाण म्हणाले.
  कॉर्पोरेट घराणी आणि उद्योगपतींना खुश करण्यात सरकार यशस्वी झाले आहे. पण देशातील सर्वसामान्य नागरिकांची मात्र घोर निराशा केली आहे, असे खासदार चव्हाण म्हणाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.