Advertisement

रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, नवाब मलिक यांचा पलटवार

रश्मी शुक्ला यांनी २०१९ मध्ये सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी भाजपच्या विरोधात असणाऱ्या राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, नवाब मलिक यांचा पलटवार
SHARES

गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट आहेत. त्यांनी २०१९ मध्ये सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी भाजपच्या विरोधात असणाऱ्या राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना नवाब मलिक (nawab malik) यांनी तोच रिपोर्ट दाखवून आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, कोणताही मंत्री आपल्या अधिकारात या बदल्या करु शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे. जे खालचे अधिकारी आहेत त्यांच्या बदल्यांसाठी देखील समिती आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत.

महाराष्ट्रात आता भाजपला आमदार फोडता येत नाही, म्हणून महाविकासआघाडी सरकारला बदनाम करून, केंद्राचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार बदलता येईल, असे प्रयत्न भाजप करत आहे, असा दावा देखील यावेळी नवाब मलिक यांनी केला.

हेही वाचा- “मुख्यमंत्री पवारांच्या ताटाखालचे मांजर झालेत”

पोलीस बदल्यांचं रॅकेट

पोलीस दलात बदल्यांचं खूप मोठं रॅकेट असून यात अनेक अधिकारी देखील सामील असल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना मिळाली होती. ही माहिती त्यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना दिली. पोलीस महासंचालकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला विनंती करून सर्व संशयीतांच्या कॉल इंटरसेप्शनची परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्यावर कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्फोटक माहिती समोर आली. बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक मोठे अधिकारी आणि राजकीय लोकांची नावं समोर आली होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून केला.

मुख्यमंत्र्यांचं पांघरूण

त्यानंतर हे सर्व पुरावे रश्मी शुक्ला यांनी २५ ऑगस्ट २०२० रोजी पोलीस महासंचालकांपुढं ठेवले. त्यांची गंभीर दखल घेत २६ आॅगस्टला पोलीस महासंचालकांनी यासंबंधातील एक अहवाल तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवत या प्रकरणी सीआयडी चौकशी आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. हा अहवाल मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पाठवण्यात आला होता. त्यावर पोलीस महासंचालकांनी ताबडतोब कारवाई करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला. परंतु २५ ऑगस्ट २०२० पासून आत्तापर्यंत काहीच कारवाई झाली नाही. हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही, उलट हे गृहमंत्र्यांकडेच का पाठवलं. मुख्यमंत्र्यांनीच या सगळ्यावर पांघरुण घातलंय, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.

(former police officer rashmi shukla is bjp agent says nawab malik)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा