जेएनयू हल्ल्याविरोधात मागील २ दिवसांपासून गेट वे ऑफ इंडियावर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन सुरू असताना सोमवारी रात्री एका तरूणीने 'फ्री काश्मीर'चे पोस्टर झळकावलं. या पोस्टरवरून विरोधकांनी सरकारला टीकेचं लक्ष्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या सर्वांवर खुलासा करताना हे पोस्टर झळकावणारी तरूणी पुढं आली आहे.
हेही वाचा- काश्मीर तोडण्याची भाषा सहन करणार नाही- संजय राऊत
जेएनयू मध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. परंतु विद्यार्थ्यांची ही आंदोलने फुटरतावाद्यांच्या पाठिंब्यावर होत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ‘फ्री काश्मीर’चं पोस्टर झळकावण्यावरून हे सिद्ध होत असल्याचं भाजपने म्हटलं आहे.
हे पोस्टर महेक मिर्झा प्रभू या तरूणीने झळकावलं होतं. या आरोप-प्रत्यारोपानंतर महेकने खुलासा केला आहे. महेक म्हणते, काश्मीरमध्ये गेल्या १५० दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प आहे. इंटरनेट, मोबाईल, दळणवळण व्यवस्था बंद आहेत. आपण इथं राहून त्यांच्या अडचणी समजू शकत नाही. त्यामुळे आपल्यासारखं स्वातंत्र्य काश्मीरमधील लोकांनाही मिळालं पाहिजे. ही भूमिका मांडण्यासाठीच मी हे पोस्टर झळकावलं. शिवाय मी काश्मीरमधील नसून मुंबईत राहणारी असल्याचंही महेकने स्पष्ट केलं.
हेही वाचा- JNU च्या निषेधार्थ मुंबईतील आंदोलन मागे