महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं. सोबतच शिवाजी पार्क जिमखान्याला देखील भेट दिली.
अभिवादनानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडविणाऱ्या शिवाजी पार्क जिमखान्याला देखील भेट दिली. कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मैदानाची पाहाणी करत उपलब्ध सोयी सुविधांचा आढावा घेतला. शिवाजी पार्क जिमखान्याने आजवर क्रिकेट, टेनिस, बुद्धिबळ, कबड्डी-खो खो अशा क्रीडाप्रकारातील असंख्य खेळाडूंना नावारूपाला आणलं. यासंबंधीची माहिती शिवाजी पार्क जिमखान्याचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी सुनील रामचंद्रन यांनी कोश्यारी यांना दिली. यावेळी महापालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर उपस्थित होते. यावेळी कोश्यारी यांनी उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांसोबत विविध विषयांवर चर्चा देखील केली.शिव जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. pic.twitter.com/A66y6Vj2ge
— Governor of Maharashtra (@maha_governor) February 19, 2021
तत्पूर्वी, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी सहभागी झाले. यावेळी संगीत कला अकादमीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी सुरेल गीतांनी प्रभावित राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी अकादमीला २५ हजार रुपयांचं बक्षिस जाहीर केलं.