Advertisement

कामवाल्या बाईंना येऊ द्या, सहकारमंत्र्यांची हाऊसिंग सोसाट्यांना तंबी

राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असून काही गृहनिर्माण सोसायट्या अनावश्यकपणे काही निर्बंध लादत आहेत.

कामवाल्या बाईंना येऊ द्या, सहकारमंत्र्यांची हाऊसिंग सोसाट्यांना तंबी
SHARES

महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत हळुहळू अनलाॅकिंगला सुरूवात करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व व्यवहार देखील पूर्वपदावर येत आहेत. परंतु काही नियमांबाबत स्पष्टता नसल्यानं गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. काही सोसायट्यांमध्ये घरकाम करणाऱ्या महिला, शहराबाहेरून आलेले नातेवाईक, भाजी-दूधवाल्यापासून घरातील छोट्या-मोठ्या दुरुस्तीसाठी कामगारांना प्रवेश दिला जात असला, तरी अद्याप काही सोसायट्या सावधगिरी बाळगून सोसायटी बाहेरच्यांना प्रवेश देण्याचं टाळत आहेत. त्यावर राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचं (housing societies in mumbai and pune may not impose strict lockdown rules on residents says cooperation minister balasaheb patil) पालन करावं, असं आवाहन सोसायट्यांना केलं आहे.

मुंबईसह राज्याभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी गृहनिर्माण संस्थांनी आपापल्या सोसायट्यांतील रहिवाशांसाठी काही नियम व अटींचं पालन करणं बंधनकारक केलं. रहिवाशाच्या दूरच्या नातेवाईकांसह कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सोसायटी, इमारत, चाळीमध्ये प्रवेश न देणे, केवळ सोसायटीमधील रहिवाशांनाच आत-बाहेर जाण्याची मुभा, दररोज येणारा दूध विक्रेता, वृत्तपत्र, सेल्समन, घरकाम करणाऱ्या महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. अनेक सोसायट्यांनी केवळ अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावं, असे नियम केले. तर काही सोसायट्यांमधील सदस्यांना पूर्वपरवानगीशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. या नियमांचं काटेकोरपणे पालन झाल्यामुळे कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात नियंत्रणात आणणं शक्य झालं.

हेही वाचा - 'मिशन बिगीन अगेन'द्वारे नातेवाइकांसाठी सोसायट्यांचे दार उघडे

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मागील अडीच महिने मुंबईत सुरू असलेलं लॉकडाऊन ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शिथिल करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबईतील व्यवहार टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात येत आहेत. परंतु अजूनही काही सोसायट्यांमधील रहिवाशांना कडक नियमांचं पालन करावं लागत आहे. याची दखल राज्याचे सहकार व पणनमंत्र्यांनी घेतली. 

यासंदर्भात बाळासाहेब पाटील म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात जनतेने रस्त्यावर न येता चांगला प्रतिसाद दिला. आज लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असून काही गृहनिर्माण सोसायट्या अनावश्यकपणे काही निर्बंध लादत आहेत. तरी गृहनिर्माण सोसायट्यांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावं.

मुंबई, पुणे तसंच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमध्ये वयोवृद्ध लोक राहतात त्यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी बाहेरील महिला येतात, त्यांना प्रवेश दिला जात नाही. तसंच दूध, भाजीपाला पुरवठा करणाऱ्यांना आणि कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना गृहनिर्माण सोसायटी चेअरमन, संचालक मंडळ अनावश्यकपणे निर्बंध घालत आहे. तरी राज्यातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं, असंही आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे.

हेही वाचा - कचरा वर्गीकरण करणाऱ्या सोसायट्यांची पालिका ठेवणार नोंद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा