SHARE

वादग्रस्त नागरिकत्व दुरूस्ती कायदा (CAA) लागू झाल्यानंतर ईशान्य भारतातील आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. या कायद्याच्या विरोधात रविवारी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. मात्र या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांची धरपकड सुरू केल्याने पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये धुमश्चक्री पाहायला मिळाली. जामियाच्या आंदोलनाला आयआयटी मुंबई (IIT Bombay) आणि टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (TISS) च्या विद्यार्थ्यांनी पाठिंबा देत मुंबईत आंदोलन केलं.

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी रविवारी मशाल रॅली काढत जामियातील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला. या रॅलीचा व्हिडिओ तसंच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. शिवाय ट्विटरवर #IITBombay असा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला. 

हेही वाचा- CAB: महाराष्ट्रात ‘कॅब’च्या विरोधात काँग्रेस, शिवसेना काय करणार? 

तर, ‘टिस’च्या विद्यार्थ्यांनी लेक्चर तसंच फिल्डवर्कवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. जामियातील आंदोलनकर्ते विद्यार्थी, अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि ईशान्येकडील राज्यात या कायद्याचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष अत्याचार केल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांवर अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी टिसच्या विद्यार्थ्यांनी आंबेडकर गार्डनपर्यंत मोर्चा देखील काढला. या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

केंद्र सरकारने नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती केल्यापासून आसाम, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम, नागालँड, मिझाेरमसह ७ राज्यातील लोकं या कायद्याचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. पोलिसांनी आंदोलकर्त्यांची धरपकड सुरू करताच या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. 

या कायद्याला विरोध करताना दिल्लीतील जामियाच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी लाठीमार केल्यावर ४ बससह अनेक वाहने पेटवून देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांची धरपकड सुरू केली. या घटनेचा विद्यापीठाच्या कुलगुरूंनीही निषेध केला. तर पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर अलिगढ विद्यापीठ प्रशासनाने सुट्या जाहीर केल्या आहेत.  


संबंधित विषय
ताज्या बातम्या