शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये - शरद पवार

  Nariman Point
  शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये - शरद पवार
  मुंबई  -  

  विरोधासाठी विरोध कधीच करणार नाही, तशी आमची भूमिकाही नाही. परंतु समृद्ध महामार्गाला असंख्य शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये. सुरुवातीस समृद्ध महामार्ग प्रकल्पाच्या दोन्ही बाजू समजून घेणे आवश्यक असल्याची भूमिका मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मांडली.

  यापूर्वी सरकारच्या वतीने काही अधिकाऱ्यांनी आपणास समृध्दी महामार्ग प्रकल्पाबाबत माहिती दिली होती. आता शेतकऱ्यांची बाजू समजून घेणे आवश्यक होते. त्यासाठी राष्ट्रवादी भवनामध्ये बाधीत शेतकऱ्यांची तसेच संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत आणि प्रकल्पाबाबत आपली भूमिका मांडली. शेतकऱ्यांची बाजू ऐकल्यानंतर लक्षात आलं की, आदिवासी भागातील जमिनी संपादित करायच्या असतील तर पेसा कायद्याप्रमाणे तिथल्या ग्रामपंचायतीची परवानगी घेणे आवश्यक असते. पण सरकारतर्फे या तरतूदींची पूर्तता झालेली दिसत नाही. अनेक शेतकऱ्यांची संमती नसताना त्यांच्या जमिनीची मोजणी केली गेली. ज्या लोकांचा प्रकल्पाला विरोध आहे त्यांच्यावर पोलीस बळाचा वापर केला जात आहे असे तेथील लोक सांगत आहेत. सरकार प्रकल्पग्रस्तांना किती मोबदला देणार याबाबतही सरकारने खुलासा केला नाही असेही पवार म्हणाले.समृद्धी महामार्गाबाबत सरकारने केलेले सादरीकरण अपुरे दिसत आहे अशी खंतही पवारांनी यावेळी व्यक्त केली.

  समृद्धी महामार्ग प्रकल्पाबाबत विस्तृत चर्चा व्हावी यासाठी 12 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून औरंगाबाद येथे समृद्धी प्रकल्पाबाबत एका परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, बाधित शेतकरी तसेच संघर्ष समितीच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.