पत्रकार संरक्षण विधेयक याच अधिवेशनात आणणार- मुख्यमंत्री

 Mumbai
पत्रकार संरक्षण विधेयक याच अधिवेशनात आणणार- मुख्यमंत्री

मुंबई - पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांबद्दल विधानसभा आणि विधान परिषदेत शनिवारी चिंता व्यक्त करण्यात आली. चार वर्षात 337 पत्रकार आणि 52 मीडिया हाऊसवर हल्‍ले झाले आहेत. अशा परिस्थितीमध्येही पत्रकार संरक्षण कायदा का केला जात नाही? असा प्रश्न भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला. गेली काही वर्ष पत्रकार संघटना पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा करा, अशी मागणी सातत्यानं करत आहेत.शुक्रवारी पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामीण पत्रकारांपासून संपादकांपर्यंत असे हल्ले वारंवार होत आहेत. त्यामुळे पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधातील विधेयक याच अधिवेशनात मांडले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. तर पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा निषेध विधान परिषदेत व्यक्त केला गेला.

पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला असून अद्याप पोलिसांना आरोपी सापडू शकले नाहीत, हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रियी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी दिली. तर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही घटनेचा निषेध व्यक्त केला.

Loading Comments