Advertisement

'मेट्रो कारशेड प्रकरणात शरद पवार करणार मध्यस्थी?

मुंबई मेट्रोचं कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या जागेवरील मेट्रो कारशेडच्या कामावर स्थगिती आणण्यात आली आहे.

'मेट्रो कारशेड प्रकरणात शरद पवार करणार मध्यस्थी?
SHARES

मुंबई मेट्रोचं कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या जागेवरील मेट्रो कारशेडच्या कामावर स्थगिती आणण्यात आली आहे. परिणामी पुन्हा एकदा केंद्र आणि ठाकरे सरकार यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. त्यामुळं मेट्रोचा हा वाद सोडवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मध्यस्थी करणार असल्याची चर्चा आहे. तसंत, गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेणार असल्याची माहिती, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

मुंबई मेट्रो-३ च्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील १०२ एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली. त्या जमिनीवर कोणतंही काम करण्यास तूर्त मनाई करण्यात आली आहे. मेट्रोचं कारशेड 'आरे'तून हलवून कांजूरमार्ग इथं कामाची सुरुवात करणाऱ्या राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारला घेरलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हा मेट्रो कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी विरोधकांना चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, मेट्रो कारशेडचा वाद सोडवण्यासाठी शरद पवार हे मध्यस्थी करणार असल्याचीही चर्चा आहे. कांजुरमार्ग मेट्रो कारशेडचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यावर निर्णायक समाधानकारक तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली. यावेळी कांजुरमार्ग कारशेडवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. यास नवाब मलिक यांनी दुजोरा दिला.

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. कारशेडबाबत कुठे तरी एकमत व्हायला हवे, अशी पवारांची भूमिका आहे. तर, वाद सोडून कुठला मार्ग निघाला तर बघायला हवं, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडल्याचं समजतं,' असं नवाब मलिक यांनी नमूद केलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा