• भाजपाची ही सूज की बळ? - दिवाकर रावते
SHARE

मुंबई - शिवसेनेनेबरोबर युती करेपर्यंत भाजपा कुठेच नव्हती. युती केल्यानंतर भाजपा राज्यात पसरली. आता मोदींच्या लाटेत भाजपाचे जास्त उमेदवार निवडून आलेत. पण येत्या महापालिका निवडणुकीत भाजपाची कीती ताकद आहे, हे समोर येईल. त्यामुळे ही सूज आहे की बळ ते कळेलच, अशा शब्दांत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भाजपाचा समाचार ‘मुंबई लाईव्ह’च्या ‘उंगलीं उठाओ’ या कार्यक्रमात घेतला.

दिवाकर रावते यांनी ‘मुंबई लाइव्ह’च्या टीमसह फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विविध प्रश्नांची रोखठोक आणि बेधडक उत्तरे दिली. प्रत्येक घराला शिवसेना आपली वाटत आहे. आयत्यावेळी जे उगवते ते कधीही जास्त दिवस टिकत नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपावर नेम साधला. युती झाली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपतील. पण हेच आता त्यांना समजत नसेल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यास आम्ही मावळे सज्ज आहोत. शिवसेनेच्या विरोधात बोलून भाजपाने शिवसैनिकांना अधिक कडवट बनवले, त्याबद्दलही त्यांनी भाजपाच्या नेत्यांचे आभार मानले. ‘किरिट सोमय्यांचा नेम चूकलाच’ असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.
67 वर्षांचे एसटी महामंडळ 2 हजार कोटी रुपये तुटीत होते. पण, आपण मंत्री झाल्यानंतर महामंडळाच्या सवलती रद्द केल्या, त्यामुळे लवकरच त्याचा परिणाम दिसेल. तसंच आरटीओ कार्यालयातील दलालराज संपवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या केवळ ४० टक्केच कर्मचारी असून आता 1 हजार पदांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. पण, नागरिकांनी दलालांकडून वाहन परवाना बनवून घेण्याऐवजी स्वतः जाऊन परवाना बनवावा, असं आवाहनही रावते यांनी केले.

मनसे आहे का?
भाजपासोबतची युती फसल्यातच जमा असून मनसेसोबत युती करणार का याबाबतचा प्रश्न विचारला असता, रावते यांनी मनसे आहे का असाच उलट सवाल केला. मनसेच्या युतीबाबत बघावे लागेल, नाडी तपासावी लागेल, असं सांगितलं. त्यांनी टाळी मागितली असली तरी, आम्ही टाळ कुटणारे नाही. आम्ही झिम्मा फुगडी खेळत नाही, असं सांगत मनसेच्या युतीबाबत शिवसेना गंभीरच नसल्याचं स्पष्ट केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या