Advertisement

Lockdown 5.0: महाराष्ट्र सरकारची नियमावली जाहीर, तुम्हाला वाचायलाच हवी...

पाचव्या टप्प्यातील लाॅकडाऊनमध्ये बऱ्यापैकी शिथिलता करण्यात आली असून फेजनुसार हे लाॅकडाऊन हळुहळू शिथिल हाेत जाईल.

Lockdown 5.0: महाराष्ट्र सरकारची नियमावली जाहीर, तुम्हाला वाचायलाच हवी...
SHARES
Advertisement

देशव्यापी लॉकडाऊनचा पाचवा टप्पा १ जूनपासून सुरू होत आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने रविवारी लॉकडाऊन ५.० साठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे (lockdown 5.0 new guideline issue from maharashtra government) जाहीर केली आहेत. या टप्प्यातील लाॅकडाऊनमध्ये बऱ्यापैकी शिथिलता करण्यात आली असून फेजनुसार हे लाॅकडाऊन हळुहळू शिथिल हाेत जाईल.

कोविड -१९ साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जारी केलेली ही मार्गदर्शक तत्वे ३० जूनपर्यंत संपूर्ण राज्यभर लागू असणार आहेत. ही मार्गदर्शक तत्वे राज्य सरकारने  ‘मिशन बिगेन अगेन’ (Mission Begin Again) म्हणत जारी केली आहेत.  या मार्गदर्शक सूचनांनुसार कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली जाईल. त्याशिवाय इतर कुठल्याही हालचालींना मनाई असेल. त्याशिवाय वैद्यकीय आपत्कालीन सेवा आणि अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यालाच कंटेन्मेंट झोनच्या आत किंवा बाहेर परवानगी असेल.

दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि पुण्यासह रेड झोन भागातील काही निर्बंध शिथिल करत राज्य सरकारने निर्बंध टप्प्याटप्प्याने अतिरिक्त कामांना परवानगी दिली आहे.

पहिला टप्पा

पहिल्या टप्प्यात, कंटेन्मेंट झोन वगळून रेड झोनमध्ये हालचालींना परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पहाटे ५.०० ते संध्याकाळी ७.०० वाजेदरम्यान समुद्रकिनारे, खेळाच्या मैदानासह मोकळ्या जागांवर वैयक्तिक शारीरिक व्यायामाला परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, एकत्रितरित्या येऊन  शारीरिक कसरत, व्यायामासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. लांब पल्ल्याच्या प्रवासालाही परवानगी नसेल. ३ जूनपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा पुरविणारी सरकारी कार्यालये १५ टक्के मनुष्यबळासह कार्यरत होतील.

हेही वाचा- लाॅकडाऊन ५.०: धार्मिक स्थळं, सलून, रेस्टाॅरंटसोबत आणखी काय सुरू होणार?

दुसरा टप्पा

५ जूनपासून सुरू होणाऱ्या दुसर्‍या टप्प्यात लागू होणारी मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता इतर सर्व बाजारपेठा, दुकाने यांना एक दिवसआड आॅड इव्हन पद्धतीने काही अटींवर सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल. याचा अर्थ रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील, तर दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची दुकानेच या वेळेत सुरू राहतील. 

कोविड १९ चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दुकानांतील ट्रायल रूमचा वापर करण्यास परवानगी नसेल. सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचं पालन करणं या दुकानांना बंधनकारक असेल. जी दुकाने किंवा बाजारपेठा नियमांचं पालन करण्यास अपयशी ठरतील, त्यांना स्थानिक प्रशासनाकडून बंद करण्यात येईल.

घरानजीकच्या बाजारपेठांमध्ये जाणे, जाण्यासाठी चालण्याचा किंवा सायकलचा वापर करण्याचा सल्ला राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवे व्यक्तीरिक्त इतर सेवांसाठी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वाहनांचा वापर करण्यास मनाई असेल. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

टॅक्सी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांमध्ये चालकासह केवळ ३ जणांनाच परवानगी असेल तेही फक्त अत्यावश्यक कामांसाठी. तर दुचाकीवर केवळ एका व्यक्तीस परवानगी असेल.

तिसरा टप्पा

८ जूनपासून लागू होणाऱ्या तिसर्‍या टप्प्यात सर्व खाजगी कार्यालये १० टक्क्यांच्या मनुष्यबळासह काम करू शकतील, तर उर्वरित व्यक्ती घरून काम करू शकतील. कोरोना व्हायरसचा प्रसार होणार नाही, याकरीता कामाच्या ठिकाणाचं पूर्ण निर्जंतुकीकरण करणं आवश्यक राहील.

उर्वरित राज्यात प्रतिबंधित नसलेल्या सर्व हालचालींना परवानगी दिली जाईल. जिल्हांतर्गत बस सेवाला ५० टक्के क्षमतेसह चालवण्याची परवानगी असेल.

प्रतिबंधीत

राज्यभरातील शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था बंदच राहतील. मेट्रो रेल्वे, आंतरराष्ट्रीय प्रवास, सिनेमा हॉल, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर, बार आणि तत्सम ठिकाणे बंद राहतील.

कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय, खेळ, करमणूक आणि शैक्षणिक मेळाव्यास परवानगी नसेल. मात्र केंद्र सरकारने ८ जूनपासून प्रार्थना स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे.

बार्बर शॉप्स, सलून, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर आतिथ्य सेवा देखील राज्यभर बंदच राहतील. परिसरानुसार आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने या सेवा सुरू करण्यात येतील.  

हेही वाचा- लाॅकडाऊन ५.०: मुंबई, पुण्याला सवलतीची शक्यता कमीच?

संबंधित विषय
Advertisement