Advertisement

देवरा दक्षिण मुंबई काबिज करणार?

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना चांगलीच टक्कर दिल्याने हा मतदारसंघ देवरा पुन्हा एकदा काबिज करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देवरा दक्षिण मुंबई काबिज करणार?
SHARES

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना चांगलीच टक्कर दिल्याने हा मतदारसंघ देवरा पुन्हा एकदा काबिज करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ऐन लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. या नियुक्तीनंतर मुंबई काँग्रेसची सर्व सूत्रे हाती घेऊन देवरा यांनी मुंबईतील काँग्रेसच्या इतर उमेदवारांना पाठबळ दिलं. तसंच स्वत:ही सर्वशक्तीनिशी आपल्या मतदारसंघात प्रचार केला. मनसेच्या पाठिंब्यापाठोपाठ जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनीही देवरा यांना पाठिंबा दिल्याने देवरा चांगलेच चर्चेत आले. 


त्यातुलनेत शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत जागोजागी अडखळताना दिसले. शिवडी, बीडीडी चाळ येथील रखडलेला पुनर्विकास, वरळीतून जाणारा कोस्टल रोड प्रकल्प इत्यादींबाबत रहिवाशांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सावंत यांची चांगलीच गोची झाली. 

१९९६ आणि १९९९ साली भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांच्या विजयाचा अपवाद सोडल्यास या मतदारसंघावर काँग्रेसनेच वर्चस्व राखलं आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे मुरली देवरा ४ वेळा, तर मिलिंद देवरा २ वेळा लोकसभेवर गेले आहेत. त्यामुळे हा देवरा कुटुंबाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. 

२०१४ साली झालेल्या मतदारसंघाच्या फेररचनेमध्ये हा मतदारसंघ शिवडीपर्यंत पोहचल्याने शिवसेनेची ताकद या भागात वाढली. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे नेते अरविंद सावंत निवडून आले. अरविंद सावंत यांनी २०१४ मध्ये देवरा यांचा १,२८,५६४ मतांनी पराभव केला होता. सावंत यांना ३,७४,६०९ मतं मिळाली होती. तर देवरा यांना २,४६,०४५ मतं मिळाली होती. मोदी लाटेत सावंत यांच्या मतात २५.२७ टक्क्यांची वाढ झाली होती, तर देवरा यांची १०.९१ मतं घटली होती.

यंदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईत ५१.४६ टक्के मतदान झालं आहे. त्यापैकी सर्वाधिक मतदान मलाबार हिल इथं ५६.०९ टक्के झालं आहे. हा भाग प्रामुख्याने उच्च वर्गात मोडणाऱ्या मतदारांचा आहे. तर शिवडी या मराठीबहुल भागात ५२.६३ टक्के मतदान झाल्याने देवरा यांना या मतदारसंघात अॅडव्हांटेज मिळाल्याचं म्हटलं जात आहे.  

मतदानाची विभागवार आकडेवारी पुढीलप्रमाणे:

  • मलाबार हिल येथील २,६०,६५७ मतदारांपैकी १,४६,२०० मतदारांनी (५६.०९%) मतदान केलं. 
  • तर भायखळ्यात २,४३,४७८ मतदारांपैकी १,३२,८५७ मतदारांनी (५४.५७%) मतदान केलं.
  • शिवडीत २,७४,४०७ मतदारांपैकी १,४४,४२० मतदारांनी (५२.६३%) मतदान केलं. 
  • वरळीत २,६७,५६५ मतदारांपैकी १,३९,१०५ मतदारांनी (५१.९९%) मतदान केलं. 
  • मुंबादेवीत २,४२,६१० मतदारांपैकी १,१७,२५६ मतदारांनी (४८.३३%) मतदान केलं.
  • कुलाब्यात २,६५,२०८ मतदारांपैकी १,१९,७७४ मतदारांनी (४५.१६%) मतदान केलं.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा