Advertisement

मतमोजणीची तयारी पूर्ण; २५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती

महाराष्ट्र विधानसभेचे २८८ मतदारसंघ आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

मतमोजणीची तयारी पूर्ण; २५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती
SHARES

महाराष्ट्र विधानसभेचे २८८ मतदारसंघ आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. 

'अशी' होणार मतमोजणी

गुरूवार २४ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचं २ वेळा प्रशिक्षण देण्यात आलं आहे. राज्यातील २६९ ठिकाणी २८८ केंद्रावर ही मतमोजणी होईल. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात १४ ते २० टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर), दोन सहाय्यक असे ३ मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असतो.

मतदारसंघातील ५ बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे ५ बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात. व्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी केली जाते. सुरूवातीला टपाली मते आणि बारकोडद्वारे इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजली जातील.

व्हिडिओ चित्रीकरण

प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्राँग रूमपासून ईव्हीएमची ने-आण करण्यासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्ट्राँगरूम तसंच मतमोजणी केंद्रात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्राँगरूममधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी व नंतर पेट्या स्ट्राँग रूममध्ये जमा करणे या सर्व बाबींचं व्हिडिओ चित्रीकरण केलं जाईल.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्वर) उपस्थित राहतील. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील.  सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.

मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्राँगरूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.

मंत्रालयात एलईडीवर निकाल  

मंत्रालयात निकालाची माहिती देण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने व्यवस्था केली आहे. मंत्रालयासमोरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या एलईडी स्क्रीनवरही निकाल प्रदर्शित करण्यात येतील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांना तात्काळ निकाल उपलब्ध करून देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात आले आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर तसेच 'Voter Helpline' या गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड ऍपवर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.



हेही वाचा-

‘या’ एक्झिट पोलचा 'मनसे' निकाल, जिंकणार ‘इतक्या’ जागा

Exit Polls: शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य- संजय राऊत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा