भाजपने मित्रपक्षांना महायुतीत सामील करून जागा दिल्या असल्या, तरी भाजपच्याच चिन्हावर निवडणूक लढवण्यास भाग पाडल्याने मित्रपक्षातील नेतृत्व भाजपवर चांगलंच नाराज झालं आहे. “भाजपाने मला फसवलं, माझ्या पक्षाला धोका दिला,” असा आरोप करत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्या नाराजीला मोकळी वाट करून दिली. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाविषयची नाराजी उघड केली.
जानकर म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी जागा वाटपाच्या झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होतो. दिल्लीतून माझ्या पक्षासाठी जागा देखील देण्यात आल्या. परंतु राज्याच्या कार्यकारणीत निर्णय बदलण्यात आला. मी याबाबत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांशी बोललो असता दोघांनीही हात वर केले. भाजपने मला सरळसरळ फसवलं. माझ्या पक्षाला धोका दिला,” असा आरोप जानकर यांनी केला.
दौंड, जिंतूरच्या जागेवरील उमेदवाराला भाजपने एबी फाॅर्म दिल्याने हे उमेदवार माझे राहिले नाहीत. फक्त परभणी जिल्ह्यातील गंगाखेडच्या जागेवरच रासपचा उमेदवार रिंगणात आहे. परंतु युतीत ही जागासुद्धा शिवसेनेच्या वाटेला आहे. त्यामुळे तिथं मैत्रीपूर्ण लढत करून शिवसेना-भाजपने मला मदत करावी. अन्याय झाला असला, तरी युतीतच राहणार आहे. पुढचा निर्णय कार्यकर्तेच घेतील, असंही जानकर म्हणाले.
हेही वाचा-
राज्यभरात ४० लाख बोगस मतदार, निवडणूक थांबवा - प्रकाश आंबेडकर
भाजपची ‘अडचण’ समजून युती केली- उद्धव ठाकरे