मुंबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ हायप्रोफाइल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष आणि शिक्षणमंत्री आशिष शेलार निवडणूक लढवत असल्याने या मतदारसंघावर सर्वांचीच नजर असणार आहे. हा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. या मतदारसंघात भाजपच्याच पूमन महाजन खासदार आहेत.
एकाबाजूला पाली हिल, रणवार, माऊंट मेरी, युनियन पार्क, विलिंग्डन, सांताक्रूझ, हसमुख नगरमधील उच्चभ्रू वस्तीत राहणारे सेलिब्रिटी तर दुसऱ्या बाजूला खारदांडा, चिंबई व्हिलेज, संतोष नगर, आंबेडकर नगर, नर्गिस दत्त नगर येथील गावठाण, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे सर्वसामान्य अशी मिश्र लोकवस्ती या मतदारसंघात येते. मराठी हिंदू मतदारांसोबतच मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा अल्पसंख्यांक मतदारांच्या मतांचाही इथं मोठा प्रभाव आहे.
हा मतदारसंघ आधीपासूनच काँग्रेसचा गड मानला जातो. त्याआधारे २००९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार बाबा सिद्दीकी यांनी भाजपच्या आशिष शेलार यांना अवघ्या दीड हजार मतांनी पराभूत केलं हाेतं. परंतु पुढच्याच निवडणुकीत २०१४ मध्ये शेलार यांनी बाबा सिद्दीकी यांचा २६,९११ मतांनी दणदणीत पराभव केला.
यंदाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री राहिलेल्या शेलार यांचं पारडं जड मानलं जात आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने आसिफ झकेरीया यांना रिंगणात उतरवलं आहे. झकेरीया काँग्रेसची पारंपरिक मतं खेचण्यात किती यशस्वी ठरतात हे या निवडणुकीत पाहायला मिळेल.
हेही वाचा-
Maharashtra Assembly Election - चांदिवलीत नसीन खान यांच्यासमोर दिलीप लांडे यांचं आव्हान