राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण, पण संख्याबळाचं काय?

राज्यपालांकडून तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यानुसार राष्ट्रवादीला पुढच्या २४ तासांत संख्याबळ दाखवावं लागणार आहे.

  • राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण, पण संख्याबळाचं काय?
SHARE

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिल्याने महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. यानंतर राज्यपालांकडून तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यानुसार राष्ट्रवादीला पुढच्या २४ तासांत संख्याबळ दाखवावं लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांना राज्यपालांकडून फोन आल्याचं पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यानंतर पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनकडे रवाना होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राजभवन इथं पोहोचल्यावर राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं. तसंच सत्ता स्थापनेसाठी मंगळवारी रात्री ८.३० वाजेपर्यंतची मुदत दिली. त्यानुसार राष्ट्रवादी आपला मित्रपक्ष काँग्रेसशी चर्चा करून सत्तास्थापनेबाबतचा निर्णय घेईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

तत्पूर्वी भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांकडून शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यासाठी सोमवार ७.३० वाजेपर्यंतची मुदत शिवसेनेला देण्यात आली होती. यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळावा यासाठी शिवसेनेकडून सातत्याने हालचाली सुरू होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका होत होत्या. अखेर राज्यपालांनी दिलेली वेळ संपत असताना शिवसेनेचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर दाखल झाले.

परंतु या नेत्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना वेळेत देता आलं नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितली. परंतु वेळ वाढवून देण्यास राज्यपालांनी नकार दिल्याने शिवसेनेच्या नेत्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. 

यानंतर राज्यपाल ५४ जागा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला नियमानुसार सत्तास्थापनेसाठी निमंत्रीत करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. राष्ट्रवादी सरकार स्थापन करण्यात अयशस्वी झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस राष्ट्रपतींकडून होऊ शकेल.

सद्यस्थितीत भाजपकडे १०५, शिवसेनेकडे ५६, राष्ट्रवादीकडे ५४ आणि काँग्रेसकडे ४४ जागांचं संख्याबळ आहे.हेही वाचा-

शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा, मात्र वेळ निघून गेली...

शिवसेनेला पाठिंबा द्या, उद्धव ठाकरेंनी दिला अधिकृत प्रस्तावसंबंधित विषय
ताज्या बातम्या