Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भाजपचा प्रतिसाद, जेलभरो आंदोलन केलं स्थगित

वीजबिलांची वसुली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नी २४ फेब्रुवारीला होणारं राज्यव्यापी आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भाजपचा प्रतिसाद, जेलभरो आंदोलन केलं स्थगित
SHARES

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे नवे आकडे भीतीदायक आहेत. या पार्श्ववभूमीवर सामाजिक जबाबदारीचे भान राखणं गरजेचं आहे. त्यामुळे वीजबिलांची वसुली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नी २४ फेब्रुवारीला होणारं राज्यव्यापी आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,  भाजपने २४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांचे प्रश्न आणि वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावर राज्यव्यापी जेलभरो आंदोलनाची हाक दिली होती. जवळपास राज्यातील ५०० ते ५५० ठिकाणी भाजपचे आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी, या आंदोलनात सहभागी होणार होते. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सर्व नेते या आंदोलनाचं नेतृत्व करणार होते. सर्वच नियोजित ठिकाणी आंदोलनाची योजना तयार झाली होती. जवळपास ५० हजार पीडित जनता आणि भाजपचे कार्यकर्ते जेलमध्ये जातील, अशी योजना होती.

परंतु मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार आणि राज्यातील स्थिती लक्षात घेता कोविड १९ चे काही निर्बंध लक्षात घेता हे आंदोलन पुढं ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

हेही वाचा- पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठोडांनी अखेर सोडलं मौन

ऊर्जामंत्र्यांनी जनतेला १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचं तसंच कोरोना काळातील एप्रिल, मे, जून व जुलै या महिन्यांचं वीज बिल माफ करण्याचं आश्वासन दिलं होते. लॉकडाऊन काळात पाठविण्यात आलेली अवाजवी वीज बिलं दुरूस्ती करून देण्याचा शब्दही दिला होता. यापैकी एकही आश्वासन न पाळता उलट अवाजवी वीज बिलांची सक्तीने वसुली करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. बिल न भरल्यास वीज कनेक्शन कापण्याच्या नोटिसा लाखो ग्राहकांना पाठवण्यात आल्या आहेत. 

तर दुसरीकडे अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत करण्याऐवजी वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा पाठविल्या गेल्या आहेत. आमचं आंदोलन स्थगित झाले असलं तरी सरकारने या मागण्यांबाबत तातडीची बैठक घेऊन वीज तोडणीला स्थगिती द्यावी, अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रूपये एकरी मदत द्यावी, अशा मागण्या भाजपकडून करण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

(maharashtra bjp jail wide agitation postponed due to covid 19 infection)

हेही वाचा- ग्राहकांचं थकीत वीज बिल १०० कोटींच्या पुढं, बेस्ट घेणार कठोर भूमिका


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा