Advertisement

वीज कंपन्यांच्या कारवाईविरोधात भाजपचं २४ फेब्रुवारीला जेलभरो आंदोलन

वीज कंपन्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कापत असून सरकार शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडत आहे, या कारवाईच्या निषेधार्थ, २४ फेब्रवारी रोजी भाजपकडून राज्यभरात २८७ ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

वीज कंपन्यांच्या कारवाईविरोधात भाजपचं २४ फेब्रुवारीला जेलभरो आंदोलन
SHARES

दमदाटी व पोलिसी बळाचा वापर करून महाराष्ट्रात मुघलशाही कारभार सुरु आहे. वीज कंपन्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कापत असून सरकार शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडत आहे, या कारवाईच्या निषेधार्थ, २४ फेब्रवारी रोजी भाजपकडून राज्यभरात २८७ ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत एवढं तीव्र आंदोलन झालं नसेल, तेवढं तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारपरिषदेत केली.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रातील वीज खात्याकडून संपूर्ण राज्यामध्ये घरगुती आणि शेतकऱ्यांची वीज जोडणी कापली जात आहे. तेही दमदाटी करून, पोलिसांच्या बळाचा वापर करून इतक्या मुघलशाही पद्धतीने महाराष्ट्रात यापूर्वी कधीही कारभार करण्यात आलेला नव्हता. परंतु मागील ८ दिवसांपासून वीज खात्याकडून अशाच पद्धतीचं काम सुरू आहे.

मागच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ५ वर्षे शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापू नये, ४५ लाख शेतकऱ्यांना २८ हजार कोटी रुपये खर्च झाल्यानंतरही एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन आम्ही कापलं नाही. परंतु या सरकारने शेतकऱ्यांच्या ट्रान्सफार्मवरूनच वीज कनेक्शन कापणं सुरू केलं. ऐन हंगामात, पिकांना पाण्याची गरज असताना संपूर्ण राज्यात डिस्कनेक्शन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या कारवाईच्या निषेधार्थ, २४ फेब्रवारी रोजी भाजपकडून राज्यभरात २८७ ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

हेही वाचा- “वीज जोडणी तोडणाऱ्या ठाकरे सरकारचं जनतेपासून कनेक्शनच तुटलंय”

दरम्यान, राज्यातील असे असंख्य वीज ग्राहक आहेत, ज्यांनी वाढीव वीज बिलात सवलत मिळेल या आशेवर अजूनही वीज बिलं भरलेली नाहीत. त्यातच वीज कंपन्यांनी मागील ७ ते ८ महिन्यांपासून वीज बिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी एप्रिलपासून कापण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे या ग्राहकांची मोठी अडचण झाली आहे. भरमसाठ बिल भरता न आल्यास त्यांची वीज जोडणी कापली जात आहे.

लाॅकडाऊनच्या काळात राज्यातील सर्वच वीज कंपन्यांनी ग्राहकांना वाढीव वीज बिलं पाठवल्याने ग्राहकांचा खिसा कापण्यात आल्याची भावना आहे. ही वीज बिलं माफ झालेली नसतानाच ज्यांनी वीज बिल भरलेलं नाही, त्यांची वीज जोडणी कापण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. याकडे पाहता ठाकरे सरकारचं जनतेपासून कनेक्शनच तुटलं आहे. परंतु भाजप कुठल्याही प्रकारे ग्राहकांची वीज कापू देणार नाही, असा इशारा भाजप नेते आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी दिला होता. 

(bjp maharashtra calls jail wide agitation against power cut decision)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा