Advertisement

भाजपला मेट्रोच्या कामात अडथळा आणायचाय- नवाब मलिक

भाजपच्या लोकांना मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा आहे, त्यासाठीच भाजपकडून कटकारस्थान सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

भाजपला मेट्रोच्या कामात अडथळा आणायचाय- नवाब मलिक
SHARES

कांजूरमार्ग येथील जागा खासगी असल्याचा दावा करणारी भाजप (bjp) आता हीच जागा मिठागरांची असल्याचं सांगत आहे. भाजपच्या लोकांना मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा आहे, त्यासाठीच भाजपकडून कटकारस्थान सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी केला.

उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडची (metro car shed) जागा राज्य सरकारने एमएमआरडीएला (MMRDA) वर्ग केली ती जागा मिठागरांसाठी आहे आणि आता कारशेड बनवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने देण्यात आली, असं पत्रात म्हटलं आहे. त्यावरून भाजपकडून राज्य सरकारवर (maharashtra government) सातत्याने टीका सुरू आहे.

हेही वाचा- विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा! ही ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती

यावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले की, याआधी मिठागराच्या बर्‍याचशा जागा राज्य सरकारला केंद्राने २००२ साली वर्ग केल्या आहेत. भाजपचे लोक सुरुवातीला ही खाजगी जागा आहे सांगत होते आणि आता केंद्र सरकारच्या मालकीची आहे असे सांगत आहेत. यावरुन भाजपच्या लोकांना मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा आहे. त्यासाठीच भाजपकडून कटकारस्थान सुरू आहे, असं दिसतंय, असं नवाब मलिक म्हणाले. (maharashtra cabinet minister nawab malik defends kanjurmarg land for metro car shed)

राज्य सरकारने आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे पर्यावरण संवर्धनाचं काम झालं आहे. मेट्रो ३ आणि मेट्रो ६ हे दोन्ही मार्ग जोडले जाऊन २० लाख प्रवाशांना त्याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे या जागेसंदर्भातील सर्व कागदपत्रे ही राज्य सरकारकडून केंद्र सरकाच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाला पाठवण्यात येतील, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

दरम्यान, कांजूरमार्ग इथं सुरू असलेलं मेट्रो कारशेडचं काम ताबडतोब थांबवा. कारण या जागेवरील हक्क आम्ही अजून सोडलेला नाही. त्यामुळे कांजूरमार्गची जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवण्यात आलं आहे. या पत्रामुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र विरूद्ध राज्य सरकार असा वाद पुन्हा विकोपास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा