Advertisement

बाॅलिवूडला संपवण्याचे प्रकार सहन करणार नाही- उद्धव ठाकरे

गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे.

बाॅलिवूडला संपवण्याचे प्रकार सहन करणार नाही- उद्धव ठाकरे
SHARES

गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचं किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावलं. (maharashtra cm uddhav thackeray reacts on bollywood drugs connection and film city in up)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवार १५ आॅक्टोबर २०२० रोजी मल्टिप्लेक्स, सिनेमागृहांच्या मालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही, तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनत आहेत. या बॉलिवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हा एक मोठं मनोरंजन उद्योग क्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते, तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत.

हेही वाचा - पुढील ३ महिने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती, ‘बार्क’चा मोठा निर्णय

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून सर्वात पहिल्यांदा बाॅलिवूडला टार्गेट करण्यात आलं. बाॅलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाही-कंपूशाही असून यामुळे टॅलेंट असूनही असंख्य कलाकारांना डावलण्यात येतं, त्यांचं विविध प्रकारे शोषण केलं जातं, असे आरोप करण्यात आले. सुशांत प्रकरणात तर पोलिसांनी अनेक मोठ्या बॅनरच्या निर्मात्यांची चौकशी देखील केली. तर सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.

सुशांत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यावर पुन्हा बाॅलिवूडवर आरोप करण्यात आले. बाॅलिवूड आणि ड्रग्ज माफियांचं कनेक्शन असून बाॅलिवूडमधील अनेक अभिनेते-अभिनेत्री या ड्रग्जच्या जाळ्यात अडकलेले आहेत, अशा वावड्या उठल्या. अंमली पदार्थविरोधी पथकाने तर दीपिका, सारा अली खान इ. सारख्या मोठ्या अभिनेत्रींची चौकशीही केली. त्यातून अद्याप ठोस हाती आलेलं नसून याप्रकरणी चौकशी सुरूच आहे.

दुसरीकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फिल्मसिटी आणि त्याला आवश्यक अशा सर्व सुविधा उभारण्याची घोषणा केली. त्यामुळे बाॅलिवूडची बदनामी आणि बाॅलिवूडला मुंबईतून इतरत्र हलवण्याच्या चर्चांना उधाण आलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा