Advertisement

“परप्रांतातून मुंबईत अनेकजण येतात, त्यातले काहीजण ऋण मानतात, तर काही मानत नाही”

कंगनासोबतच्या वादावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया न देणारे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच कंगनाला अप्रत्यक्षपणे टोला हाणला आहे.

“परप्रांतातून मुंबईत अनेकजण येतात, त्यातले काहीजण ऋण मानतात, तर काही मानत नाही”
SHARES

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणारी तसंच मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणारी बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना नेत्यांमधील वाकयुद्ध चांगलंच टिपेला जाऊन पोहोचलं आहे. या सगळ्या वादावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया न देणारे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच कंगनाला अप्रत्यक्षपणे टोला हाणला आहे. (maharashtra cm uddhav thackeray slams actress kangana ranaut over her offensive statement on mumbai)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन भरवण्यात आलं आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी विधानसभा सदस्य चंद्रकांता गोयल, माजी राज्यमंत्री अनिलभैया राठोड यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी अनिल राठौड यांना आदरांजली वाहताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कंगनाला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.

हेही वाचा- कंगना गोत्यात? विधानसभा अध्यक्षांनी दिले २४ तासांत अहवाल सादर करण्याचे गृहमंत्र्यांना आदेश

अनिल राठौड राजस्थानहून इथं आले. पहिल्यांदा मुंबई, नंतर मंचर आणि तिथंही मन रमत नसल्याने ते नगरमध्ये गेले. कोणतीही मोठी संस्था त्यांच्या पाठिशी नव्हती. त्यांचा कारखानाही नव्हता. तरीही पावभाजी असेल ज्यूस अशा माध्यमांतून त्यांनी काम सुरू केलं. पुढे शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते शिवसेनेत आले. ज्यूसची गाडी चालवणारा माणूस पुढे आमदार व मंत्री होईल हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. मात्र तसं घडलं. त्यांनी विचारांशी बांधिलकी ठेवली. जनतेचा माणूस म्हणून आपली ओळख निर्माण केली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिलभैया राठोड यांच्या आठवणी जागवल्या. अनेकजण इतर प्रांतातून मुंबईत, महाराष्ट्रात येतात. रोजी रोटी कमावतात, नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात काहीजण मानत नाहीत, असं म्हणत त्यांनी कंगनाला टोला हाणला.

दरम्यान, कंगना रणौत हिच्याविरोधात पोलिसांत तक्रार झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांकडेही तक्रार करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी पुढील २४ तासांत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याच्या गृहमंत्र्यांना दिले आहेत. यामुळे कंगना आणखी गोत्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबईची पाकव्याप्त काश्मीर व तालिबानशी तुलना करून बेछूट आरोप करणाऱ्या कंगनावर योग्य ती कारवाई करण्याची लेखी विनंती मी आज विधानसभा अध्यक्षांना केली. त्यांनी गृहमंत्र्यांना याची तातडीने चौकशी करून २४ तासात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे, असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- “मुंबईचा अपमान करणाऱ्या कंगनाला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देणं धक्कादायक”

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा