Advertisement

काँग्रेसची सोशल मीडियाची जंबो कार्यकारिणी जाहीर, भाजपला देणार टक्कर

बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची जंबो कार्यकारिणी पक्षातर्फे जाहीर करण्यात आली.

काँग्रेसची सोशल मीडियाची जंबो कार्यकारिणी जाहीर, भाजपला देणार टक्कर
SHARES

सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं मतपरिवर्तन करण्यात अग्रेसर असलेल्या भाजपला (bjp) टक्कर देण्यासाठी काँग्रेसने देखील कंबर कसली आहे. बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची जंबो कार्यकारिणी पक्षातर्फे जाहीर करण्यात आली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने अभिजीत सपकाळ यांनी बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची जंबो कार्यकारिणी जाहीर केली. या जंबो कार्यकारिणीत ४२८ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. नव्या कार्यकारिणीत ४८ जिल्हाध्यक्ष, २५२ विधानसभा अध्यक्ष, ११८ प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि १० कोअर कमिटी सदस्यांचा समावेश आहे.

हेही वाचा- “हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य, भाजपमधील काही नेते टेन्शनमध्ये आले असतील”

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेली सक्रियता, संघटन कौशल्य, तंत्रज्ञानाचा जबाबदारीपूर्वक वापर, अशा विविध गोष्टींचा विचार करून मोठ्या छाननी प्रक्रियेतून पक्षातर्फे ४२८ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (maharashtra congress) ‘सोशल मीडिया वॉरियर्स’ भाजपचा अपप्रचार हाणून पाडतील, असा आम्हाला विश्वास असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष अभिजीत सपकाळ यांनी सांगितलं.

पक्षाच्या सोशल मीडिया विभागाने २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती तसंच लॉकडाऊनच्या काळात पक्षाची भूमिका जनतेतील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील अतिशय प्रभावीपणे केलं. त्यामुळे येत्या काळात पक्षाची ध्येयधोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकारिणीतील प्रत्येक पदाधिकारी यशस्वीपणे पार पाडेल, असा विश्वास देखील सपकाळ यांनी व्यक्त केला.

(maharashtra congress appoints new mega social media team)

संबंधित विषय
Advertisement