Advertisement

coronavirus updates: बंद ३१ मार्चपर्यंत नाही, तर पुढील आदेशापर्यंत..,अजित पवार यांचा धोक्याचा इशारा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेला बंद केवळ ३१ मार्चपर्यत नाही, तर जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत कायम राहील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

coronavirus updates: बंद ३१ मार्चपर्यंत नाही, तर पुढील आदेशापर्यंत..,अजित पवार यांचा धोक्याचा इशारा
SHARES

महाराष्ट्रात आतापर्यंत ५२ कोरोनाबाधीत (Coronavirus) रुग्ण आढळले असून देशातील इतर राज्यांत असलेल्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांच्या तुलनेत राज्यात ही संख्या जास्त आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी महामुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या शहरांतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी नुकतेच दिले. परंतु हा बंद केवळ ३१ मार्चपर्यत नाही, तर जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत कायम राहील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

हेही वाचा- Coronavirus Updates: मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, रेल्वे, बस, बँका सोडून ‘ही’ ४ शहरं ३१ मार्चपर्यंत बंद

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी शुक्रवारी दुपारी पुण्याचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रोज विभागीय आयुक्त पत्रकार परिषद घेतात.  पण आज पुणे जिल्ह्याचा आढावा घेतल्याने मी पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला माहिती देत आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. 

कोरोनाचा प्रादुर्भाव (COVID-19) रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे. पुढचे १५ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक नागरिकाने इच्छाशक्ती दाखवून घरी राहिलं पाहिजे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तसंच कोणीही अफवा पसरवू नका. लग्न समारंभही पुढं ढकला. अगदीच शक्य नसेल तर मुलाकडचे आणि मुलीकडचे असे २५ लोक मिळून ते लग्न पा पाडा. इतकंच नाही तर दहावं, तेरावं असेल तर तिथंही लोकं गर्दी करतात. तिथंही गर्दी करु नका. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा आहेत, त्यामुळे त्या बंद करता येणार नाहीत. पण उगाचच गर्दी करून या सेवा बंद करण्याची वेळ आणू नका, असं आवाहन त्यांनी केलं. 

व्यापाऱ्यांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावं. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मालकांनी वेतन द्यावं, कंपन्या बंद ठेवल्याने त्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे. पण माणूस गमावण्यापेक्षा आर्थिक नुकसान परवडलं. त्यामुळे कंपन्यांनी अशा वेळी सहकार्य करावं. सध्या तरी केंद्राकडं निधी मागण्याचं काही कारण नाही. करोनाशी लढा देण्यासाठी राज्य सरकारकडे पुरेसा निधी आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयेही तयार ठेवण्यात आली आहेत. नगरपंचायत आणि नगरपरिषदेला निधीची कमतरता भासू देणार नाही, असं आश्वासनही यावेळी पवार यांनी दिलं. 

हेही वाचा- नाहीतर महाराष्ट्रात खराखुरा कर्फ्यू लागू करा, मनसेची मागणी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा