SHARE

विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासी बांधव गुरुवारी आझाद मैदानावर धडकले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी रात्री सायन इथं मुक्काम करत गुरुवारी पहाटे साडे चार वाजता शेतकरी आझाद मैदानाच्या दिशेनं निघाले. सकाळी ८ वाजता शेतकरी परळला पोहचले. तर दुपारी ११ वाजेपर्यंत हजारो शेतकरी आझाद मैदानावर पोहचले.

आझाद मैदानावर आलेल्या मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. यानंतर आता या लोकसंघर्ष मोर्चाचं शिष्टमंडळ गुरुवारी दुपारी १:३० वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.   


हजारोंच्या संख्येनं मुंबईच्या रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शिस्त आणि शांततेचं दर्शन घडवलं आहे. मार्च मध्ये मुंबईकरांना विशेषतः दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात त्रास होऊ नये म्हणून शेकडो मैल पायपीट करून थकलेल्या पायातून रक्त वाहणाऱ्या शेतकऱ्यांनी रात्रीच आझाद मैदानाकडे कूच केली होती. त्यानुसार यावेळीही शेतकऱ्यांनी मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत शांतता आणि शिस्तीत मोर्चा काढला आहे. 

शेतकरी नाराज 

कर्जमाफीसह १२ मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून मार्चमध्ये शेतकऱ्यांनी विराट मोर्चा काढून शेतकऱ्यांचं वास्तव समोर आणलं होतं. या मोर्चानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करत त्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. मात्र ८ महिने उलटले तरी अद्याप या आश्वासनासंदर्भात कोणतीही कार्यवाही सरकारने केलेली नाही. त्यामुळे नाराज शेतकरी आता आणखी आक्रमक झाला आहे.

लोक संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पुन्हा मोर्चाची हाक दिली. ठाणे ते आझाद मैदान असा हा मोर्चा असून बुधवारी ठाण्यातून या मोर्चाची सुरुवात झाली आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता हा मोर्चा आझाद मैदानावर पोहचला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या