वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला २५ मे पर्यंत मुदतवाढ

राज्य सरकारने वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला २५ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातील राज्य सामाईक (सीईटी) प्रवेश परीक्षा कक्षाने परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे.

SHARE

पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चालू शैक्षणिक वर्षात २०१९-२०२० मराठा आरक्षण लागू करता येणार नाही, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर अडचणीत आलेल्या राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांची फी भरण्याचा निर्णय घेतला. परंतु विद्यार्थी आंदोलनावर ठाम राहिल्याने अखेर राज्य सरकारने वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला २५ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातील राज्य सामाईक (सीईटी) प्रवेश परीक्षा कक्षाने परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे.  

आंदोलन सुरूच

राज्य सरकारने नागपूर खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने राखीव कोट्यातून पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रर्वगातून अर्ज करावा लागणार आहे. यावरून मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडलं आहे. जोपर्यंत प्रवेश प्रक्रिया पुढं ढकलण्याचं लेखी आश्वासन सरकारकडून मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतल्याने हा तिढा सुटत नव्हता. 

सुधारीत वेळापत्रक लवकरच

अखेर राज्य सरकारने प्रवेश प्रक्रियेला २५ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. १३ मे पासून पुढचे ७ दिवस प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली असून प्रवेश प्रक्रियेचं सुधारीत वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहितीसाठी  www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन सरकारने केलं आहे.  

वैद्यकीय आणि दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकची मुदतवाढ मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती करण्याचा सरकारचा विचार आहे, असंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.हेही वाचा-

अजित पवारांनी घेतली मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांची भेट

वैद्यकीय प्रवेश: राज्य सरकार भरणार मराठा विद्यार्थ्यांची फीसंबंधित विषय
ताज्या बातम्या