Advertisement

लसीकरणासाठी गर्दी होण्याची शक्यता, राज्य सरकारने रणनिती ठरवावी- देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीत आधी लसीकरणाबाबत एकवाक्यता असावी आणि त्यासाठी राज्य सरकारने योग्य धोरण ठरवावं, अशी मागणी भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

लसीकरणासाठी गर्दी होण्याची शक्यता, राज्य सरकारने रणनिती ठरवावी- देवेंद्र फडणवीस
SHARES

येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना देखील कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आधी लसीकरणाबाबत एकवाक्यता असावी आणि त्यासाठी राज्य सरकारने योग्य धोरण ठरवावं, अशी मागणी भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली आहे.

नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, लसीकरणाबाबतीत केंद्राचं धोरण काय आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे. ते राज्य सरकारने नीट समजून घेतलं पाहिजे. महाविकास आघाडीने एकवाक्यता तयार करावी. १ मे पासून आपली लसीकरणाची रणनिती काय असेल, ते आपण ठरवलं पाहिजे. कारण खूप मोठ्या संख्येने लोकं लसीकरणात सहभागी होणार आहेत. यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होण्याची आणि त्यातून अव्यवस्था होण्याची शक्यता आहे. म्हणूनच सरकारणे आपली रणनिती ठरवली पाहिजे.

हही वाचा- “आम्हाला लस १५० रुपयांना मिळायला हवी, नाहीतर…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘मन की बात’द्वारे हे स्पष्ट केलं आहे की, केंद्र सरकारतर्फे प्रत्येक पात्र व्यक्तीचं मोफत लसीकरण होणार आहे. त्यामुळे राज्यांवर त्याचा भार नाही. ज्या राज्यांना असं वाटतं की आपल्या राज्यातील लसीकरण वेगात व्हावं, त्यांना बाजारातून लस विकत घेण्याची स्वायत्तता देखील देण्यात आली आहे. खासगी आस्थापनांना देखील लस विकत घेऊन देता येईल. तरीही वेगवेगळ्या मंत्र्यांकडून वेगवेगळी विधानं, ट्विट का केली जात आहेत, ते ट्विट्स डिलिट का केली जात आहे, त्यावर मी बोलणार नाही. परंतु प्रत्येक भारतीयांकरीता १०० टक्के लसीकरणाची व्यवस्था केंद्राने उभारली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एवढंच नाही, तर महाराष्ट्राच्या (maharashtra) मागणीनुसार १६ लाखांच्या उत्पादनापैकी ४ लाख ३५ हजार एवढा रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा एकट्या महाराष्ट्रला देण्यात आला आहे. सोबतच साडेसतराशे मेट्रिक टन आॅक्सिजनचा पुरवठा केंद्राकडून राज्याला झाला आहे. अकराशे पेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स यापूर्वीच महाराष्ट्राला मिळाले आहेत. त्यामुळे जे कांगावेखोर आहेत, त्यांना माझी विनंती आहे की लोकं दु:खात आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकार मदत करतंय, राज्य सरकार आपल्या परिने प्रयत्न करतंय, तेव्हा त्यांनी रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.

(maharashtra government must plan a strategy for covid 19 vaccination says devendra fadnavis)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा