Advertisement

महाराष्ट्रात सरसकट निर्बंध उठवणार नाही- उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात सरसकट सगळे निर्बंध उठविण्यात येणार नसून काळजीपूर्वक पुढे जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

महाराष्ट्रात सरसकट निर्बंध उठवणार नाही- उद्धव ठाकरे
SHARES

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून आपण लसीकरण करत असलो तरी आरोग्याचे नियम पाळत राहिले पाहिजे. केंद्राने चित्रपटगृहे व इतर काही बाबतीत निर्बंध बऱ्यापैकी शिथील केले आहेत. आपण देखील बऱ्यापैकी व्यवहार सुरु केले आहेत. असं असलं, तरी महाराष्ट्रात (maharashtra) सरसकट सगळे निर्बंध उठविण्यात येणार नसून काळजीपूर्वक पुढे जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना सादरीकरणावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले, कोविडचं लसीकरण वेगाने सुरु आहे. परंतु ब्रिटन, ब्राझिलमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे आणि मृत्यू होत आहेत ते पाहता आपण बेसावध न राहता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

समूह प्रतिकारशक्तीमुळे (हर्ड इम्युनिटीमुळे) आपल्याकडे लक्षणीयरित्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असं जर आपण मानत असू तर अशाच प्रकारे समूह प्रतिकारशक्तीनंतर देखील युरोपमध्ये संसर्गाची दुसरी जोरदार लाट आलेली दिसते हे लक्षात घ्यावं.

हेही वाचा- महाराष्ट्रात आतापर्यंत साडेतीन लाख जणांचं लसीकरण

सध्या चीनमधून पसरलेल्या मूळ विषाणूव्यतिरिक्त ब्राझिलियन, आफ्रिकन, युके असे या विषाणूचे तीन आणखी स्ट्रेन असून आपल्याकडे ते पसरू नयेत म्हणून अधिक दक्षता घ्यावी लागेल व जागरूकता बाळगावी लागेल, असं उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले.

अजूनही परदेशातून येणारे प्रवासी अन्य मार्गाने थेट महाराष्ट्रात पोहोचत आहेत. याबाबत केंद्राशी पत्रव्यवहार केला आहे, पण आणखी एकदा विनंती करून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळाच्या शहरातच विलगीकरणात ठेवावं, असं सांगणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

यावेळी लोकल सर्वांसाठी सुरु केल्यावर २० लाख प्रवासी मध्य रेल्वेवर, तर १४ लाख प्रवासी पश्चिम रेल्वेवर नोंदवले गेले, अशी माहिती मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी यावेळी दिली. विवाह समारंभ, अंत्यसंस्कार यांना  केंद्र सरकारने १०० जणांची उपस्थितीस परवानगी दिली असली तरी आपल्याकडे अजूनही ५० जणांची उपस्थिती तर अंत्यसंस्कारासाठी अजूनही २० जणांनाच परवानगी आहे. त्याचप्रमाणे १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये ७५ टक्के उपस्थितीच्या अटींशिवाय सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

(maharashtra government will not left total lockdown restrictions due to covid 19 says cm uddhav thackeray)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा