Advertisement

संजय राठोडांची अखेर गच्छंती, राज्यपालांकडून राजीनामा मंजूर

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

संजय राठोडांची अखेर गच्छंती, राज्यपालांकडून राजीनामा मंजूर
SHARES

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे. यामुळे राठोड यांचं मंत्रीपद वाचण्याच्या उरल्यासुरल्या आशा देखील आता संपुष्टात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)  यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे.

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणात विरोधक भाजपचा दबाव वाढल्यानंतर संजय राठोड यांनी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राठोड यांचा राजीनामा फ्रेम करुन लावण्यासाठी घेतलेला नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्यावर कार्यवाही होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. 

परंतु प्रत्यक्षात राजीनामा घेऊन २ ते ३ दिवस उलटून गेले, तरीही संजय राठोड यांचा राजीनामा अजूनही मुख्यमंत्री कार्यालयातच पडून असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे संजय राठोड (sanjay rathod) तांत्रिकदृष्ट्या मंत्रीपदी कायम असल्याच्या चर्चांनी सर्वांच्या नजरा उद्धव ठाकरे यांच्याकडे वळल्या होत्या. त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांकडून ४ मार्च रोजी दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचं पत्र राज्यपालांना प्राप्त झालं. त्यानंतर त्यांनी हा राजीनामा ताबडतोब मंजूर केला.

हेही वाचा- राठोडांचा राजीनामा अजूनही मुख्यमंत्र्यांच्याच खिशात?

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणात आॅडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होऊ लागले. एवढंच नाही, तर याप्रकरणी चौकशी होऊन सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत संजय राठोड यांना मंत्रीपदावर बसवणं चुकीचं असल्याने त्यांना तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत होती.

तर दुसऱ्या बाजूला पक्षाची प्रतिमा बिघडू नये म्हणून संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला असला, तरी शिवसेनेतील (shiv sena) काही नेते मात्र या राजीनाम्यावरून नाराज आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा पक्षाने राजीनामा घेतलेला नसताना केवळ राठोड यांचा राजीनामा घेणं, हा समान न्याय नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा