Advertisement

पूजा चव्हाण प्रकरणी नियमानुसारच चौकशी- अनिल देशमुख

राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची देखील चौकशी करण्यात येईल आणि वस्तुस्थिती समोर आल्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं.

पूजा चव्हाण प्रकरणी नियमानुसारच चौकशी- अनिल देशमुख
SHARES

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात नियमानुसार राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची देखील चौकशी करण्यात येईल आणि वस्तुस्थिती समोर आल्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी दिलं.

स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणाच्या ११ ऑडिओ क्लिप्सही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील एका मंत्र्याचं नाव या प्रकरणात समोर आलं. भाजपकडून राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आला असून त्याचा राजीनामा घेण्याची मागणी देखील होत आहे. त्यातच ८ दिवसांपासून संजय राठोड गायब असल्याने, भाजप नेते अधिकच आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा- तर लाॅकडाऊन हाच शेवटचा पर्याय, राजेश टोपेंचा इशारा

त्यावर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख म्हणाले की, संजय राठोड कुठं आहेत? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी गृहखात्याचा मंत्री म्हणून सांगतो की, याप्रकरणी नियमानुसार चौकशी व कारवाई होणार आहे. जे काही सत्य असेल ते महाराष्ट्रासमोर येईल. एकदा संपूर्ण चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर, वस्तूस्थितीसमोर आल्यानंतर राज्य शासन त्यावर निर्णय घेईल. पोलीस व्यवस्थित तपास करत आहेत. विरोधीपक्ष ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत, त्या आरोपात काही तथ्य नाही. 

दरम्यान, तरुणीच्या कुटुंबावर दबाव असू शकतो. पोलिसांनी सुओ मोटो अंतर्गत गुन्हा दाखल करायला पाहिजे. सगळे ऑडिओ क्लिप्स, फोटोंबद्दल गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे, अशी मागणी भाजपच्या (bjp) चित्रा वाघ यांनी केली होती. 

गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीही महत्वाची आहे. भाषणांमध्ये महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलणं फार सोपं असतं;   पण आता राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगायचं आहे की, एवढे पुरावे असताना कसली वाट पाहत आहात. मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पाहताय? असा प्रश्न देखील त्यांनी केला आहे.

(maharashtra home minister anil deshmukh ensure strict action in pooja chavan suicide case)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा