मुंबईमध्ये सर्व प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई पोलिस यंत्रणा अत्यंत कार्यक्षम आणि सक्षम आहे. त्यामुळे मुंबईत लष्कराचा बंदोबस्त लावणार ही निव्वळ अफवा आहे, असा खुलासा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
कोरोना पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आर्मीची नियुक्ती होणार असल्याच्या अफवा काही समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. आपली मुंबईची पोलिस यंत्रणा जागतिक पातळीवर नावाजलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत मुंबई पोलीस यंत्रणा अत्यंत सक्षमतेने कार्यरत आहे. त्याबद्दल कोणीही मनात शंका ठेवू नये, असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
याआधी मुंबई पोलिसांकडून खुलासा करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मुंबईकरांशी संवाद साधताना म्हटलं आहे की, “तुमच्याकडे खूप मोकळा वेळ असल्याची आम्हाला कल्पना आहे. पण या वेळेचा वापर अफवा पसरवण्यापेक्षा इतर चांगल्या गोष्टी करण्यासाठी देखील करता येऊ शकतो. तुम्हाला जीवनाश्यक वस्तू गोळा करण्याची गरज नाही. लष्कर किंवा निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आलेलं नाही. शांत रहा आणि घरीच थांबा. कोरोनाविरोधातील लढाईत हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे”, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं.
हेही वाचा- मुंबईत लष्कराला बोलवणार? काय आहे यामागचं खरं कारण..??
पोलीस एकटे नाहीत
त्याशिवाय, सदैव देशसेवेस कर्तव्यतत्पर असणारे पोलीस एकटे नाहीत हे अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मी फेसबुक, ट्विटर व इन्स्टाच्या अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवणार आहे. तुम्हीही आपला डीपी ठेवून पोलीस बांधवांच्या सन्मानात सहभागी व्हा, असं आवाहन देखील देशमुख यांनी नेटकऱ्यांना केलं.
चर्चांना पूर्णविराम
तत्पूर्वी, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत लष्कराला पाचारण करण्यात येणार आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. कोरोनाच्या संकटाचा अंदाज अजून अनेकांना आलेला नाही. या शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज लागता कामा नये. माझा प्रत्येक नागरिक हा सैनिक आणि जवान आहे. त्यामुळे आपण सहकार्यातून या संकटावर मात करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
सध्या सगळी यंत्रणा तणावाखाली आहे. पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार हे आपल्यासाठी लढत आहेत, आजारी पडत आहेत, दुर्देवाने काही पोलिसांचे मृत्यू देखील झाले आहेत. ते आजारी पडल्यानंतर त्यांना बाजूला करणे चुकीचे आहे, त्यांना थोड्या काळासाठी विश्रांती मिळावी म्हणून, पोलिसांना आलेला थकवा जावा म्हणून केंद्र सरकारकडे अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची विनंती आपण करत आहोत.
शिस्त पाळण्याचं आवाहन
लॉकडाऊन संपवणं आपल्या हातात आहे. आपण जेवढी शिस्त पाळू, संयम ठेऊन वागू तेवढी आपल्याला कोरोनाची साखळी तोडणं शक्य होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत केलं तसंच सहकार्य यापुढेही करावं, शिस्त पाळावी आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी, असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.