Advertisement

यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत

राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नागपूर इथं होणारं हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत
SHARES

राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नागपूर इथं होणारं हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ७ डिसेंबर २०२० पासून हिवाळी अधिवेशन घेण्यात येणार असलं, तरी ते नेमकं किती दिवसांचं असेल, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. 

मुंबईतील विधानभवनात मंगळवार १० नोव्हेंबर रोजी दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच ७ डिसेंबर २०२० ला अधिवेशन घेता येईल का आणि किती दिवस घ्यायचं याबाबतही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. 

हेही वाचा- बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा, ‘नोटा’पेक्षाही कमी मतं

राज्यातील कोरोनाची स्थिती हळुहळू आटोक्यात येत असली, तरी अजून कोरोनाग्रस्तांची संख्या म्हणावी तेवढी कमी झालेली नाही. शिवाय हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने प्रशासन देखील कामाला लागलं आहे. अधिवेश नागपूरला घ्यायचं झाल्यास महत्त्वाच्या कागदपत्रे हलवण्यासोबतच मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना नागपूरला जावं लागतं. सध्याच्या स्थितीत हा प्रवास धोक्याचा ठरू शकतो. अनेक विधिमंडळ सदस्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर इथं अधिवेशन घेणं उचित होणार नाही अशा सूचना देखील केल्या. त्याकडे पाहता हा निर्णय सर्वांसाठीच सोयीचा ठरू शकतो. या बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला. 

बैठकीला विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) , उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे) संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

(maharashtra legislative assembly winter session will be held in mumbai instead of nagpur due to coronavirus outbreak)

हेही वाचा- मुंबई महापालिका कोविड रुग्णालये चालूच ठेवणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा