Advertisement

विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे विधान परिषदेचं कामकाज तहकुब


विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे विधान परिषदेचं कामकाज तहकुब
SHARES

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या सभात्यागाची कोंडी फुटल्यानंतर विधान परिषदेचे कामकाज गुरुवारी सुरू झाले. कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेयांनी राधेश्याम  मोपलवार आणि प्रकाश मेहता प्रकरणावरून सरकारला जाब विचारत सरकारच्या पारदर्शकतेच्या विश्वासाला तडा जात असल्याचे सांगत नैतिकता आणि पारदर्शकतेचा टाहो फोडणाऱ्या सरकारने प्रकाश मेहता यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्री यावर का बोलत नाहीत?  असा जाब विचारला. काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी धनंजय मुंडे यांच्या मुद्द्याला समर्थन करत विरोधाची धार कायम ठेवली. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याशिवाय सभागृह चालू देणार नसल्याचा इशारा विरोधकांनी दिला.

विरोधकांच्या रोषाला सामोरे जाताना मोपलवार यांना चौकशी होईपर्यंत पदावरुन हटवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली. मोपलवार दोषी आढळल्यास त्यांना बडतर्फ करण्‍यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत दिले. मात्र प्रकाश मेहतांच्या बाबतीत सावध पवित्रा घेत जो भ्रष्टाचार झालाच नाही त्याची चौकशी कशी? असा सवाल त्यांनी केला. विरोधकांच्या मागणीमुळे आपण त्यांची चौकशी करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र त्याने विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यावरून प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभापतींनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले.

चोर चोरीला गेला अन अलार्म वाजला

मुख्यमंत्र्यांनी मेहतांच्या बाबतीत दिलेले स्पष्टीकरण म्हणजे 'चोर चोरीला गेला अन अलार्म वाजला' अशी गत असल्याचा चिमटा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काढला. मेहता यांनी विकासकाला १००० कोटी रुपयांचा फायदा करून द्यायचा होता.मात्र मुख्यमंत्र्यांना कळल्यावर त्यांनी त्यातून माघार घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला. या विषयावरून 'प्रकाश मेहता का उल्टा चष्मा' असे पोस्टर्स विरोधकांनी लावले.


चौकशीची मागणी राजकीय हेतूने प्रेरित

मुख्यमंत्र्यांनी मेहतांच्या चौकशीची घोषणा केली असली तरी विरोधक त्यांच्या राजीनाम्यावर ठाम होते. यावर मुख्यमंत्री संतापले आणि तुम्ही तुमच्या काळात पुरावे देऊनही किती चौकश्या केल्या असा जाब त्यांनी विरोधकांना विचारला. विरोधक राजकीय हेतूने प्रेरित होत चौकशीची मागणी आक्रमकपणे  करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा