भाजप-शिवसेना युतीला कडाडून विरोध करणारे समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवण्याच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. कधी कधी मोठ्या शत्रूला कमकुवत करण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ करावं, लागतं, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी या सरकारला पाठिंबा दिला आहे. एवढंच नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या घरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने मित्रपक्षांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत समाजवादी पक्षाचे प्रमुख अबू आझमी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रिपाइं(कवाडे)चे जोगेंद्र कवाडे इ. नेते उपस्थित होते.
हेही वाचा- भाजपाची नवी खेळी, शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची आॅफर
बैठक संपल्यानंतर बाहेर पडलेले आझमी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला होता. परंतु त्यांना एकत्र येऊन सरकार बनवता आलं नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून देशाची विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. देश हिंदू-मुस्लिम, मस्जिद-मंदिर, गाय-बैल यातच अडकला आहे. संधी मिळाली तर भाजप शिवसेनेला सोबत घेऊन पुन्हा सरकार बनवू शकतं. त्याआधी किमान समान कार्यक्रमांच्या आधारे शिवसेनेला पाठिंबा देणं केव्हाही चांगलं. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल, तर ही खेळी उपयुक्त ठरू शकते. मोठ्या शत्रूला कमकुवत करण्यासाठी लहान शत्रूला कधी कधी जवळ करावं लागतं. भिवंडी महापालिकेतही काँग्रेस-शिवसेनेचं एकत्र सरकार आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तर चालतील का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की उद्धव ठाकरे यांच्या नावाला आपला कुठलाही विरोध नाही. फक्त आमचे महत्त्वाचे प्रश्न सुटले पाहिजेत. भाजप-शिवसेनेच्या मागच्या सरकारमध्ये मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाशी संबंधित काही विषय मार्गी लागले नव्हते, त्यावर या नव्या सरकारमध्ये निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. शिवाय मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण, इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या जागेचा प्रलंबित प्रश्न, परप्रांतियांना होणारा त्रास कमी व्हावा इ. मागण्याही त्यांनी केल्या. काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत मिळून सरकार चालवताना शिवसेनेला थोडीफार मवाळ भूमिका स्वीकारावी लागेल, असंही आझमी म्हणाले.
हेही वाचा-
आता इंद्रपद दिलं, तरी माघार नाही- संजय राऊत
आता चर्चा शिवसेनेसोबत, पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती