Advertisement

उद्धव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, महाविकास आघाडी सरकार कोसळलं

मला माझ्याच लोकांनी धोका दिलाय, असं मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणताना उद्धव ठाकरे भावूक झाले.

उद्धव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, महाविकास आघाडी सरकार कोसळलं
SHARES

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह घेत यासंदर्भातील घोषणा केली.  बहुमत चाचणी उद्या म्हणजेच गुरुवारीच घेण्याचे निर्देश सुप्रिम कोर्टानं दिले. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतरण तसंच नवी मुंबई विमानतळाचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला गेला. सगळं चांगलं सुरू होतं. पण एखादी गोष्ट चांगली होत असेल तर दृष्टी लागते. तुम्हाला माहित आहे कोणाची नजर लागली.

उद्या (गुरुवारी) सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. सुप्रिम कोर्टानं बहुमत चाचणीचे निर्देश दिल्यास उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारची संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच, मला माझ्याच लोकांनी धोका दिलाय, असं म्हणताना ते भावूक झाले.

मंत्रिमंडळ बैठक संपताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या मंत्र्यांच्या खात्याचे विषय राहिले आहेत आहेत ते आपण पुढच्या कॅबिनेट मध्ये घेऊयात. तुम्ही जे सहकार्य केले आहे, त्याबद्दल धन्यवाद. मला माझ्याच लोकांनी धोका दिला म्हणून परिस्थिती निर्माण झाली आहे. जी कायदेशिर प्रक्रिया त्याला सामोरे जाऊयात. मागील अडीच वर्षात तुम्ही सहकार्य केले , त्याबद्दल आभार... जर माझ्या कडून कोणाचं अपमान झाला, दुखावले असतील तर मी माफी मागतो.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. 24 तासात राज्य मंत्रिमंडळाची दुसरी बैठक झाली. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आजच्या बैठकीसाठी मंत्रालयात उपस्थित होते.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा