Advertisement

जोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारा - रविंद्र वायकर

उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंसाठी जोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारा, अशी विनंती गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

जोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारा - रविंद्र वायकर
SHARES

क्रिकेट आणि मुंबईचे अनोखं नातं असून प्रत्येक मुंंबईकर क्रिकेटसाठी वेडा आहे. या कारणामुळे मुंबई शहराला क्रिकेटची पंढरी समजलं जातं. मुंबईत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची संख्या जास्त असल्याने अनेकांना क्रिकेट शिकण्यासाठी शिवाजी पार्क, एमआयजी क्लब यांसारख्या ठिकाणी जावं लागतं. अशा उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंसाठी जोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारा, अशी विनंती गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.


आरे परिसरात क्रिकेट स्टेडियम!

मुंबईत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची संख्या जास्त असून मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटपटू राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधीत्व करत आहेत. परंतु जोगेश्वरी परिसर व उपनगरातील क्रिकेट खेळाडूंसाठी अद्ययावत क्रिकेट स्टेडियम उपलब्ध नसल्यानं अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटूंना क्रिकेट शिकण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील शहिद विजय साळसकर उद्यानाच्या मागील बाजूस आरे येथे असलेला रिक्त भूखंड या क्रिकेट स्टेडियमसाठी आरक्षित करण्यात यावा अशी विनंती वायकर यांनी पत्राद्वारे केली आहे.


क्रिकेटपटूंना फायदा

दरम्यान या ठिकाणी क्रिकेटसाठी अद्ययावत स्टेडियम उभं राहिल्यास क्रिकेटपटूंना याचा फायदा मिळेल. त्यामुळे पूर्व उपनगरातील क्रिकेटपटूंमध्ये वाढ होऊन देशाचा नावलौकिक उंचावण्यास उपयोग होईल. भावी क्रिकेटपटू तयार करण्यासाठी या स्टेडियमचा उपयोग होणार असल्याने यासाठी येणारा खर्च हा खर्च न समजता भविष्यातील तरुण पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात आलेली गुंतवणूक असल्याचं मतही वायकर यांनी व्यक्त केलं आहे.


५० कोटींच्या तरतूदीची मागणी

उदयोन्मुख खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करुन आरेमध्ये उपरोक्त आरक्षित जागेवर क्रिकेट स्टेडियम उभारावं, तसंच येत्या २०१९-२०च्या अर्थसंकल्पात यासाठी ५० कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात यावी, अशी विनंतीही वायकर यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.


हेही वाचा -

राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर

अचानक चढला मुंबईचा पारा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा