Advertisement

आरक्षण टिकवणं ही आता सरकारची जबाबदारी - मराठा क्रांती मोर्चा

सरकारनं संविधानाच्या माध्यमातूनच आम्हाला आरक्षण दिल्यानं आता सरकारचीच जबाबदारी आहे की त्यांनी हे आरक्षण न्यायालयात टिकवून दाखवावं. तसंच आरक्षण टिकवण्याची हमी आम्हाला द्यावी, असं मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.

आरक्षण टिकवणं ही आता सरकारची जबाबदारी - मराठा क्रांती मोर्चा
SHARES

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण अडचणीत आल्याचं चित्र आहे. तर केवळ स्टंटबाजी म्हणून या याचिका दाखल केल्या जात असून आता न्यायालयात आरक्षण टिकवणं आणि आरक्षण टिकवण्याची हमी देणं ही सरकारची जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे.


घटनाबाह्य असल्याचा दावा

मराठा समाजाला देण्यात आलेलं १६ टक्के आरक्षण हे घटनाबाह्य आहे. त्यामुळं हे आरक्षण रद्द करावं अशी मागणी करणारी याचिका अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केली आहे. त्यापाठोपाठ एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनीही आरक्षणाला त्वरीत स्थगिती देत आरक्षण रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. ५० टक्क्यांच्या वर आरक्षणाची टक्केवारी गेल्यानं हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं अॅड. पाटील यांनी याचिकेत म्हटलं आहे. तर जलिल यांनी मुस्लिमांना डावलून आरक्षण दिलं जात असल्याचं म्हणत मराठा आरक्षणाला आव्हान दिलं आहे. या दोन याचिका दाखल झाल्यानं आता न्यायालयात आरक्षण टिकवण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर उभं ठाकलं आहे.


आमदारकी रद्द करा

कायद्यानं आणि घटनेनंच आम्हाला आरक्षण दिलं असल्यानं आणि कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावत आम्हाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आल्यानं आरक्षणाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. पण केवळ राजकीय वजन वाढवण्यासाठी, स्टंटबाजी करण्याकरता या याचिका दाखल होत आहेत. अशी स्टंटबाजी करणाऱ्या आमदाराची आमदारकी रद्द व्हावी यासाठी आम्ही दोन दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्र पाठवलं आहे.

आमची ही मागणी मान्य करावी यासाठी आम्ही पाठपुरावाही करत असल्याचंही आबासाहेब पाटील यांनी सांगितलं.  तर सरकारनं संविधानाच्या माध्यमातूनच आम्हाला आरक्षण दिल्यानं आता सरकारचीच जबाबदारी आहे की त्यांनी हे आरक्षण न्यायालयात टिकवून दाखवावं. तसंच आरक्षण टिकवण्याची हमी आम्हाला द्यावी, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.


तेढ होऊ देणार नाही

मुस्लिम आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या होत आहे. पण हा असा तेढ आम्ही कुठल्याही परिस्थितीत निर्माण होऊ देणार नाही. मुस्लिमच काय कुठल्याही समाजातील व्यक्तिने मराठा आरक्षणाला विरोध केला तर तो संघर्ष मराठा आणि त्या त्या समाजातील नसेल, तर जी व्यक्ती विरोधात बोलतेय त्याच्या विरोधात असेल. त्यामुळं दोन समाजात आम्ही तेढ निर्माण होऊ देणार नसल्याचंही, आबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा - 

मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी आमदार इम्तियाज जलिल न्यायालयात




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा